मुंबई: राज्यात शिवसेनेत ऑपरेशन लोटस राबवल्यानंतर भाजपला आव्हान देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोट बांधणी सुरू आहे. महाविकास आघाडीतही भाजपला रोखण्याची रणनीती आखली जात आहे. मुख्यमंत्री शिंदेंमुळे सत्तेवर आलेल्या भाजपला आगामी निवडणुकीत हादरा देण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन केले जात आहे.
शिवशक्ती - भीमशक्ती की दुसरं काही? तर दुसरीकडे महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केली होती. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहचा मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath shinde) यांनी आढावा घेतल्याने नव्या शिवशक्ती - भीमशक्ती युतीची नांदी होणार असल्याची चर्चा रंगली होती. प्रकाश आंबेडकर यांनी देखील भाजप आणि त्यांना पाठिंबा दिलेल्या कोणत्या पक्षासोबत जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु, आज आंबेडकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहात जाऊन भेट घेतल्यानंतर पुन्हा युतीच्या राजकीय चर्चांना ऊत आला होता.
प्रकाश आंबेडकर यांनी यावर खुलासा केला. कोर्टाच्या निर्णयामुळे २२ लाख घरे उध्वस्त होणार होती. कोर्टात यावर नोव्हेंबरमध्ये सुनावणी होणार आहे, ही सुनावणी पुढे ढकलण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे कोर्टात अर्ज करावा, यासाठी आज भेट घेऊन चर्चा केल्याचे आंबेडकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पत्र दिल्यास ही सुनावणी पुढे जाईल. राज्य शासनाने जमीन नोंदणीकृत करण्यासाठी काढलेल्या चार जीआरचा कालावधी वाढेल. अन्यथा २० लाख बाधित घरे उध्वस्त होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.