मुंबई : या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अशोक चव्हाण माजी मंत्री विजय वडट्टीवार, यांच्यासह सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. सत्यजित तांबे यांनी पक्षाकडून एबी फॉर्म देताना चुकीचा फॉर्म देण्यात आला. नाशिक पदवीधर मतदार संघाऐवजी नागपूर आणि अमरावती मतदारसंघाचे एबी फॉर्म आपल्याला देण्यात आले. त्यानंतर ही चूक प्रदेश कार्यालयाला सांगितल्यानंतर वडिलांच्या नावाने एबी फॉर्म पाठवण्यात आला. आपल्यासोबत षडयंत्र करण्यात आले, असा त्यांनी आरोप केला.
आरोपावर चर्चा केली जाणार : ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि तांबे कुटुंबीयांना बदनाम केले गेले. सत्यजित तांबे यांच्याकडून हे गंभीर आरोप लावत असताना त्यांचा रोख प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे होता. या सर्व गंभीर आरोपानंतर एच. के. पाटील यांनी मुंबईत 10 फेब्रुवारीला ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सत्यजित तांबे यांनी लावलेल्या प्रत्येक आरोपावर चर्चा केली जाणार आहे. यासोबतच त्यावेळी प्रदेश कार्यालयाकडून नेमकी कोणती पावले उचलण्यात आली, एबी फॉर्म कसे देण्यात आले, याचीही पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे.
तांबे पिता पुत्रांवर कारवाई : नाशिक पदवीधर मतदार संघात उमेदवारीवरून काँग्रेस पक्षामध्ये सुरुवातीपासूनच तांबे कुटुंबीय आणि प्रदेश कार्यालयात एकमत होताना दिसत नव्हते. काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे हे सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून एबी फॉर्मस देण्यात आले नसल्याचे, सत्यजित तांबे यांनी सांगितले. आपण इच्छुक असताना त्यांचे वडील सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यात आला. मात्र सुधीर तांबे यांनी अधिकृत उमेदवारी न भरता शेवटच्या क्षणी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून नाशिकच्या पदवीधर मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर काँग्रेसने आपल्याला पाठिंबा द्यावा, यासाठी सत्यजित तांबे यांनी प्रयत्न केले होते. मात्र काँग्रेसकडून तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करण्यात आली होती.
पत्रकार परिषदेत गंभीर आरोप : पक्षादेश ढवळल्याच्या कारणावरून दोन्हीही पिता-पुत्रांना पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र याबाबत तांबे कुटुंबीयांनी निवडणुकीच्या वेळी कोणतीही खुलासा न करता निवडणूक झाल्यानंतर 4 फेब्रुवारीला याबाबत आपण सविस्तर बोलणार असल्याचे संकेत सत्यजित तांबे यांनी दिले होते. यानुसार शनिवारी 4 फेब्रुवारीला सत्यजित तांबे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. नाना पटोले आणि काँग्रेस प्रदेश कार्यालयावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशमध्ये सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. सत्यजित तांबे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद नंतर 4 फेब्रुवारीला सायंकाळी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी फोनद्वारे एकमेकांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. यासोबतच काँग्रेसच्या राज्यातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशी देखील फोनवर याबाबत सविस्तर चर्चा केली आहे.
खुलासा करण्याची शक्यता : पत्रकार परिषद घेऊन सत्यजित तांबे यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले असले, तरी सत्यजित तांबे यांचे सर्व आरोप नाना पटोले यांनी फेटाळले आहेत. या सर्व प्रकरणात आपल्याकडे देखील पुरावे आहे. हा सर्व मसाला आपणही बाहेर आणू शकतो, असा इशारा नाना पटोले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला. त्यामुळे 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत याबाबत नाना पटोले खुलासा करण्याची शक्यता आहे.