मुंबई - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय (एमबीबीएस) अभ्यासक्रमांच्या उन्हाळी 2020 परीक्षा कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 15 जुलै रोजी सुरू होणाऱ्या या परीक्षा आता 17 ऑगस्टपासून सुरू केल्या जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर केले आहे.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा मागील दोन महिन्यापासून पुढे ढकलण्यात आल्या होत्या. याच दरम्यान, या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी दर्शवली होती. यासाठी तसा प्रस्तावही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विद्यापीठाने दिला होता. मात्र राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता या परीक्षा 17 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहेत.
विद्यापीठाने या परीक्षाची तयारी केली असून त्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय विद्या शाखेच्या एम.डी, एम. एस.पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या व तत्सम तसेच सर्व पदवी विद्या शाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.
हेही वाचा - राज्य परिवहन महामंडळाने मोफत बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला मागे
हेही वाचा - धक्कादायक! मुंबईत आतापर्यंत 10 वर्षाखालील 7 मुलांचा कोरोनामुळे मृत्यू