मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन आहे. यामुळे ठप्प पडलेले जनजीवन बघता यामध्ये काही प्रमाणात सुधारणा होऊन ते सुरळीत व्हावे, यासाठी राज्य शासन मिशन बिगीन अगेन ही संकल्पना राबवत आहे. या संकल्पनेद्वारे उद्यापासून (सोमवार) लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. तरी मुंबईकरांनी उद्यापासून घराबाहेर पडताना सुरक्षिततेची सर्व साधने घालून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे
कोरोनामुळे मुंबईत अडीच महिने लॉकडाऊन होते. उद्यापासून राज्य शासन लॉकडाऊनमध्ये शिथीलता देत असून, सर्वसामान्यांसाठी बस सेवा व दुकाने आस्थापना सेवा सुरू करीत आहे. राज्य शासन टप्प्या-टप्प्याने सेवा सुरू करीत असून, त्यासाठी बनवलेल्या नियमावलीचे सर्वांनी पालन करणे गरजेचे असल्याचे महापौरांनी सांगितले. बेस्ट बसमधून प्रवास करताना एका सीटवर एकजण बसणे आवश्यक असून, त्यांच्याकडे सॅनिटायझर व मास्क असणे आवश्यक आहे. तसेच खोकताना व शिंकताना प्रवाशांनी तोंडावर रुमाल धरला पाहिजे. उभा राहून प्रवास करताना गर्दी करायला नको. कंडक्टरनेसुद्धा सुरक्षिततेसाठी मास्क व चष्मा घालावा. त्यांना पैसे हाताळावे लागत असल्याने हात सॅनिटायझर करून घ्यावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.