मुंबई - कोरोना काळात मुंबईकरांसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन "ने सन्मानित करण्यात आले. "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन"चे अध्यक्ष संतोष शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रच्या अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
कोरोना काळातील कार्याची दखल घेऊन सन्मान
एक महिला व युवतींचे नेतृत्व करणाऱ्या महिला महापौर म्हणून किशोरी पेडणेकर यांचा आम्हाला अभिमान असून सर्वच महिला वर्गांसाठी त्या प्रेरणास्त्रोत असल्याचे फराह सुलतान अहमद यांनी सांगितले. कोरोना काळात त्यांच्या कामाची धडाडी व उत्साह हा आम्हाला प्रेरणा देणारा असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच आम्ही सन्मानित केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चित्रपट निर्माता अली अकबर अली अब्बास उपस्थित होते.
महापौरांचे उल्लेखनीय काम
शिवसेनेच्या नगरसेविका असलेल्या किशोरी पेडणेकर यांची महापौर पदावर नियुक्ती झाल्यावर काही काळातच कोरोनाचा प्रसार सुरू झाला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापौर पीपीई किट घालत रुग्णांना चांगले उपचार मिळतात का याचा आढावा घेत होत्या. परिचारिका म्हणून काम करणाऱ्या महापौरांनी नर्सचा गणवेश घालून रुग्णालयातील नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले होते. रुग्णांना आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून महापौर अनेक ठिकाणी भेटी देत आढावा घेत आहेत. या कामादरम्यान महापौरांना कोरोनाची लागण झाली. कोरोनामुक्त होताच त्या पुन्हा कामाला लागल्या.
हेही वाचा - ''मी देशद्रोही नाही, लक्षद्वीपला न्याय मिळेपर्यंत संघर्ष करेन'' - आयशा सुल्ताना