मुंबई Jal Jeevan Mission scheme : विधानसभेत जल जीवन मिशन योजनेवरून महायुतीतील आमदारांमध्येच खडाजंगी झाल्याचं दिसून आलं. यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार सुनील शेळके यांनी लक्षवेधीवर बोलताना जलजीवन मिशन योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं. या योजनेत निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलं आहे. कार्यालयात बनावट बिलं बनवून अधिकाऱ्यांनी खोट्या सह्या केल्या आहेत. 500 मीटरचा रस्ता असेल, तर 2 हजार मीटरची बिलं जोडण्यात आली आहेत. जल जीवन मिशन योजनेत अनेक ठिकाणी चुकीची कामं झाली आहेत. या प्रकरणाची चौकशी होणार का? यातील भ्रष्टाचारावर सभागृहानं उत्तर द्यावं, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली.
दोषींवर कारवाई करा : शेळके म्हणाले की, या योजनेत निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे. यात प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी, असं शेळके यांनी म्हटलंय. सुनील शेळके यांच्या आरोपांना उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, तुमच्याकडं खरी माहिती असेल, तर आम्हाला द्या. आम्ही माहितीची पडताळणी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू.
कामाचा राग आमच्यावर निघतो : यानंतर भाजपा आमदार नितेश राणे बोलताना म्हणाले की, या योजनेमुळं प्रत्येक गावांमध्ये एक आशेचा किरण निर्माण झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अतिशय महत्त्वाची योजना आहे. मंत्री महोदय निश्चितच मेहनत करताहेत. मंत्री गुलाबराव पाटील बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. ते निश्चितच ही योजना योग्य पद्धतीनं राबवतील यात दुमत नाही. पण, लोकप्रतिनिधी म्हणून मी गावागावात जातो, तिथं त्या कामाचा राग आमच्यावर काढला जातो. जलजीवन मिशन योजनेंतर्गत पंधरा-पंधरा कामं एकाच ठेकेदारानं घेतली आहेत. त्यामुळं ही कामे नीट झाली की नाही? हे एकदा तपासून पाहावं, असं आमदार नितेश राणे म्हणाले.
हेही वाचा -
- ठाकरे गटाच्या नेत्याची मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी, नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले फोटो; सुधाकर बडगुजर यांनी दिलं 'हे' स्पष्टीकरण
- शिवसेना आमदार अपात्र प्रकरण; निर्णय घेण्यासाठी राहुल नार्वेकरांना मुदतवाढ, वाचा नवीन तारीख काय
- दिशा सालियन प्रकरणी 'का-कू' न करता शर्मिला ठाकरेंनी घेतली आदित्य ठाकरेंची बाजू, म्हणाल्या "तो असं काही करेल वाटत नाही"