मुंबई : प्रत्येक नागरिकाने लसीचे दोन डोस घ्यावेत. लसीबाबत सामान्य नागरिकांनी मनामध्ये कोणतीही शंका-कुशंका ठेवू नये. राज्यावर आणि देशावर आलेले कोरोनाचे संकट लवकरात लवकर निघून जावे, असे म्हणत मरोळच्या 'शिवगर्जना मित्र मंडळा'ने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी गणपती बाप्पाच्या सजावटीत कोरोना मुक्तीचा संदेश या मित्र मंडळाकडून देण्यात आला आहे. बाप्पाची मूर्ती लसीच्या कुपीवर बसवण्यात आली आहे. यातून कोरोना मुक्तीचा संदेश देणाऱ्या या मंडळाच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
मरोळचा मोरया मुंबईभर प्रसिद्ध
शिवगर्जना तरुण मित्र मंडळ (मरोळचा "मोरया") गेली ५४ वर्ष अविरतपणे गणेशोत्सव साजरा करीत आहे. हे करीत असताना सामाजिक बांधिलकी लक्षात घेत समाज उपयोगी सर्व कार्य पार पाडत असतो. शिवगर्जना तरुण मित्र मंडळचा मरोळचा "मोरया" पर्यावरणपूरक मूर्ती म्हणून पूर्ण मुंबईभर नावारूपाला आहे.
आजही आपण कोरोनाच्या महामारीतून पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. उलट तिसऱ्या लाटेच्या भयावह परिस्थितीची शक्यता आहे. कोरोना लसीसंदर्भात सुद्धा अनेक जणांच्या मनात आजही शंका-कुशंका आहेत. ती भीती कुठेतरी कमी व्हावी व पूर्ण महाराष्ट्र लसवंत होऊन आपण कोरोनामुक्त व्हावे. लोकांच्या मनात कोरोना लसीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी कोरोना मुक्तीचा संदेश देणारी सजावट केली आहे.
हेही वाचा - गणरायाच्या आरतीतही राजकारण? भाजप आमदाराला दिलेल्या वेळेपूर्वीच शिवसेना नेत्यांनी उरकली आरती