मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ या मोहिमेची सुरुवात ऑगस्ट २०१९ मध्ये केली. आरोग्य, व्यायामासोबत विविध क्रीडाप्रकारांची जनजागृती व्हावी आणि देशी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘फिट इंडिया’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ‘फिट इंडिया’ मोहिमे अंतर्गत व आरोग्य विषयक जनजागृती साधण्यासाठी मुंबईमध्ये ‘अर्ध मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात येत्या फेब्रुवारी महिन्यात मुंबईमध्ये मॅरेथॉनसाठीची पूर्वतयारी म्हणून ‘प्रोमो रन’ चे आयोजन करण्यात येणार आहे.
5 हजार नागरिकांची नोंदणी : मुंबई महापालिकेचा हा उपक्रम ३ कि.मी., ५ कि.मी. व १० कि.मी. अशा ३ टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ५ हजार नागरिकांना नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या फिट मुंबई बीएमसी हाफ मॅरेथॉनचे समन्वयक व एम पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे.
ए विभागात अधिकाऱ्यांची बैठक : फिट मुंबई बीएमसी हाफ मॅरेथॉनची पूर्वतयारी म्हणून येत्या फेब्रुवारीमध्ये प्रोमो रनचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रोमो रनबाबत नुकतेच एका विशेष समन्वय बैठकीचे आयोजन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभाग कार्यालयात करण्यात आले होते. या बैठकीला मुंबई पोलिस दल, वाहतूक पोलिस यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांचे व खात्यांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
सकाळी 7 वाजता होणार सुरुवात : पालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोठे यांनी याबाबत माहिती दिली आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशांनुसार फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात फिट मुंबई बीएमसी हाफ मॅरेथॉनच्या प्रोमो रनचे आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईकर नागरिकांसह बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलिस दल यांचे अधिकारी आणि कर्मचारी भाग घेणार. या प्रोमो रनचा शुभारंभ सकाळी ७.०० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील सेल्फी पॉईट येथून होणार आहे.
या टप्प्यांमध्ये होणार विभागणी : प्रोमो रनचे आयोजन हे ३ कि.मी., ५ कि.मी. व १० कि.मी. अशा ३ टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. यातील १० किमीच्या टप्प्याची सुरुवात सकाळी ७.०० वाजता तर ५ किमीच्या टप्प्याची सुरुवात सकाळी ७.१५ वाजता आणि ३ किमीच्या टप्प्याची सुरुवात सकाळी ७.३० वाजता करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. तर स्पर्धेतील स्पर्धकांनी शुभारंभ स्थळाजवळील निर्धारित ठिकाणी पहाटे ५.०० पोहोचण्याचे बंधनकारक असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.