मुंबई Krunal Ghorpade DJ : सोशल मीडियावर Kratex नावानं प्रसिद्ध असलेला कृणाल घोरपडे यांनी मराठी गाण्यांसाठी जी चळवळ उभी केली आहे, त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. (respect to Marathi songs) ज्या पब, बार, हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजवण्यास हॉटेल मालक नकार द्यायचे तिथे आता कृणालला खास मराठी गाणी वाजवण्यासाठी आमंत्रित केलं जातं. कृणाल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, मी इलेक्ट्रॉनिक मराठी गाणी वाजवतो. मला गाणी बनवण्याची आणि ती रिमिक्स करण्याची आवड आहे. मागच्या सहा वर्षांपासूनचा माझा हा छंद. (Marathi DJ Story) मी विरारला राहणारा आणि माझ्या आजूबाजूला पूर्ण आगरी बांधवांची वस्ती आहे. त्याच्यामुळं घरात मराठी गाण्यांच्या कॅसेट्स आणि आजूबाजूला परिसरात वाजणारी गाणी देखील मराठीच. त्याच्यामुळे मी जी गाणी ऐकायचो त्यात अधिकतर ही मराठी असतात. त्यामुळे मी जेव्हा रिमिक्स बनवतो ते मराठी गाण्यांचं असतं.
कोरोना काळानंतर मिळाली ओळख : कृणाल यांनी सांगितलं की, मी जी काही गाणी बनवितो ती माझ्या मित्रांना ऐकायला पाठवतो. माझ्या घरच्यांना ऐकायला देतो आणि त्यांच्याकडून प्रतिसाद घेतो. मागच्या सहा वर्षांपासून मी हे करत आहे. मी आजही एका कंपनीमध्ये जॉब करतो. सुरुवातीला जेव्हा मी गाणी बनवायला सुरुवात केली तेव्हा एक आवड म्हणून मोबाईल वरतीच एखादा ट्रॅक घेऊन मराठी गाणं घेऊन ते रिमिक्स करायचो. हे मागचे काही वर्षे माझं सुरू होतं. कृणाल पुढे सांगतात, मला खऱ्या अर्थानं ओळख मिळाली ती कोरोना नंतर. कोरोनामुळे संपूर्ण देश ठप्प झाला आणि त्यात माझा देखील जॉब गेला. तेव्हा एका मित्रानं त्याच्या कंपनीत मला काम दिलं. हे सर्व सुरू असतानाच एका मित्रानं विचारलं तू गाणी बनवायचा ते बंद केलंस का? कोरोना काळात सोशल मीडियावर इतर लोकं त्यांची गाणी पोस्ट करत होती. पण मी कामात असल्यानं गाणी बनवायला वेळ मिळत नव्हता.
'त्या' गाण्यानं दिशाच पालटली : कृणाल यांनी सांगितलं की, जेव्हा मित्रानं प्रश्न विचारला तेव्हा मला वाईट वाटलं. कारण, ही गाणीच माझी ओळख होती आणि ती माझी ओळखच पुसली जाते की काय? असं वाटलं. मग लॉकडाऊनमध्ये मी माझी काही गाणी इंस्टाग्रामवर पोस्ट करायला सुरुवात केली. त्या गाण्यांना चांगला प्रतिसाद येऊ लागला. तेव्हा मी आपण बालवाडीमध्ये जे बालगीत म्हणायचो 'मामाच्या गावाला जाऊया' ते रीक्रिएट केलं आणि सोशल मीडियावर अपलोड केलं. त्याला काही मिलियनमध्ये व्हूवज आले. अनेक सेलिब्रिटींनी ते गाणं शेअर केलं, काहींनी त्याच्यावरती रिल्स बनवल्या आणि मी खऱ्या अर्थानं प्रसिद्धीच्या उंबरठ्यावर आलो. तेव्हा देखील मला वाटलं नव्हतं की मी डीजे होईल. कृणात पुढे म्हणतात, गाणी रिक्रेट करणे ही माझी फक्त आवड होती. माझं 'मामाच्या गावाला जाऊया' हे गाणं व्हायरल झाल्यानंतर माझे सोशल मीडियावरती फॉलोवर्स झपाट्यानं वाढले. त्यावेळी वाटलेलं की, आपण देखील इतरांसारखेच पेड प्रमोशन किंवा कोलॅब्रेशन, एखादा उद्घाटनाचा कार्यक्रम एवढेच करू, डीजे होईल असं मला देखील वाटलं नव्हतं.
अन् बाउन्सर आणि वेटरही नाचू लागले : कृणाल सांगतात, सोशल मीडियावर मी अपलोड केलेली गाणी पाहून कोल्हापुरातील रॉकी दादा यांनी मला संपर्क केला आणि त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर मला शो मिळवून देईल असं सांगितलं. आता ते माझ्या शोचे मॅनेजर आहेत. त्यांनी मला सुरुवातीला शो करण्याची संधी दिली ती पुण्यातील एका पबमध्ये. तिथे माझी गाणी लोकांना इतकी आवडली की, त्या हॉटेलमधील बाउन्सर आणि वेटर देखील नाचत होते. तिथले काही व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर पोस्ट केले आणि मग आम्हाला लोकांचे रिप्लाय येऊ लागले. त्यावेळी मला कळलं की आपण जे ऐकून होतो मराठी गाणी वाजवली जात नाहीत. ती गोष्ट खरीच आहे; मात्र पुण्यातील एका मराठी माणसाने मला गाणी वाजवण्याची संधी दिल्यानं ते शक्य झालं होतं. मराठी गाणी वाजवली जात नाहीत या गोष्टीची मनात खूप चीड होती. याच रागातून मी एक पोस्ट लिहिली आणि त्याच्या शेवटी हॅशटॅग लिहिला 'मराठी वाजलाच पाहिजे' आणि ती पोस्ट इतकी व्हायरल झाली की अनेक सेलिब्रिटींनी देखील त्यांच्या वॉलवरती माझी पोस्ट शेअर केली होती आणि इथूनच या चळवळीला सुरुवात झाली.
जागतिक सम्मेलनात वाजविलं मराठी गाणं : त्यावेळी माझ्या मनात विचार आला, माझं करिअर सुरू होण्याच्या आधीच तर संपत नाही ना? पण रॉकी दादा यांनी आणखी काही लोकांची संपर्क केला आणि मला शो मिळाले. आज माझ्या गाण्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून ज्या हॉटेल किंवा पबमध्ये मराठी गाणी वाजवली जात नाहीत असं म्हटलं जायचं तिथं खास मराठी गाणी वाजवण्यासाठी मला आमंत्रित केलं जातं, असं कृणात सांगतात. जागतिक पातळीवर सर्व डीजे आणि इलेक्ट्रॉनिक म्युझिक क्रियेटर लोकांचं संमेलन होतं. त्या संमेलनात देखील मी एकदा मराठी गाणं वाजवलं आहे. पण, माझं ध्येय आहे ज्याप्रमाणे आपण इंग्रजी आणि हिंदी गाणी ऐकतो त्याचप्रमाणे आपली मराठी गाणी परदेशात देखील वाजायला हवीत. हा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी खास करून मी मराठी जुन्या गाण्यांची निवड करतो, असं कृणाल म्हणाले.
ही आहे गाण्याची लिंक: https://www.instagram.com/reel/C1XjtXoyIpk/?igsh=MWQxYXd0ZjhtMDEweg==
हेही वाचा: