मुंबई - भाषा संस्कारांतून जन्माला येते, जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. चिंतीत भावनेने मराठी भाषा दिन साजरा करू नका, मराठीचं वाकडं करण्याची कोणाचीही हिंमत नाही, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. विधानभवनात 'मराठी भाषा गौरव दिन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
27 फेब्रुवारी या मराठी भाषा दिनी विधानभवनात सकाळी संस्कृतिक आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी आणि बारा बलुतेदारांची प्रदर्शन देखील यावेळी आयोजित करण्यात आले होते. त्यासंदर्भात आधीच सर्व कार्यक्रम ठरवण्यात आला होता. मात्र, तरीदेखील कार्यक्रमासाठी मंत्रीमंडळातील मंत्री किंवा विरोधी पक्षनेते वेळेवर पोहोचू शकले नाहीत. विशेष म्हणजे, खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बरोबर वेळेवर 10 वाजून 30 मिनिटांनी कार्यक्रमासाठी विधानभवनात दाखल झाले होते. मात्र, काही मंत्र्यांचा आणि विरोधी पक्षनेत्यांचा पत्ता नव्हता. याबद्दल माजी मंत्री दिवाकर रावते यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा - मालमत्ता कर थकवला; हिरे व्यापारी भरत शहा यांच्या 'पंचशील प्लाझा'वर पालिकेची छापेमारी
जेव्हा-जेव्हा आपल्यावर संकट आले, तेव्हा मदतीसाठी मराठी धावून आली आहे. स्वातंत्र्य चळवळीदरम्यानही 'सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?' हे विचारणारीही भाषा मराठी होती. परकीय आक्रमणावेळीही मराठी धावून गेली होती, असे ठाकरे यावेळी म्हणाले. आज शाळांमध्ये मराठी सक्तीची का करावी लागते? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
मराठी बाबत बोलताना त्यांनी आपल्या मातोश्री मीना ठाकरे यांची आठवण काढली. मी शाळेत असताना माझी आई पाटीवर अ आ इ ई गिरवून घेत होती, असेही ते म्हणाले. मराठी भाषा ही शुद्ध बोलली गेलीच पाहिजे, तशी ती शुद्ध लिहिलीही गेली पाहिजे. माझ्या आजोबांचा कटाक्ष होता की, मराठी भाषा ही ऱ्हस्व दीर्घप्रमाणेच उच्चारली गेली पाहिजे, असेही त्यांनी आपल्या आजोबांची आठवण काढताना सांगितले.
राज्यातील शाळांची नावं मराठीत का नाहीत? असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. जुन्याची गरज आजही आपल्याला आहे, असे सांगताना त्यांनी घरातील लाईट आणि दिव्यांचे उदाहरण दिले. पूर्वी वासुदेव यायचे, आम्ही लहान असताना सकाळी वासुदेवांची वाणी ऐकायला यायची. परंतु, नव्या पिढीला यातील अनेक गोष्टी माहीत नाहीत. ऐकतो मराठी, बोलतो मराठी तसे मराठी ही पाहिलीही गेली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
अनेक संतांनी आपल्याला मोठा वारसा दिला आहे. तो वाढवता आला नाही, तरी आपल्याला तो टिकावता आला पाहिजे. मराठी भाषा दिवस हा एका दिवसापुरता आणि वर्षापुरता मर्यादित न ठेवता आपले संपूर्ण आयुष्य मराठी राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - 'अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफीचा लाभ'