मुंबई - ज्येष्ठ नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक लीलाधर कांबळी यांचे मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. 'वस्त्रहरण', 'हसवाफसवी', 'केला तुका नी झाला माका', 'वात्रट मेले' यातल्या त्यांच्या भूमिका गाजलेल्या होत्या. गेली दोन वर्षं ते कॅन्सरशी लढा देत होते. रात्री 9 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांचा जाण्याने एक उत्तम अभिनेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे. त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मालवणच्या रेवंडी गावातील जत्रेतील नाटकांची तालीम, कांबळी यांच्या गावच्या घरी होत असल्याने, त्यांना नाटकाची गोडी लागली. पुढे वडिलांसोबत मुंबईत डोंगरीतील चाळीत रहायला आल्यानंतर त्यांनी राष्ट्र सेवा दलात भाग घेतला. राष्ट्र सेवा दलाची पथनाट्य, समूहनाट्य यातून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. प्राथमिक शिक्षण डोंगरीच्या शाळेत झाल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी दादरच्या छबिलदास शाळेत प्रवेश घेतला. इथेच त्यांची मराठी भाषेची आवड वाढली.
पुढे डोंगरीत त्यांची ओळख कंत्राटी नाटक करणाऱ्या मोहन तोंडवळकर यांच्याशी झाली. चाळीतील नाटकातील कांबळी यांचे काम पाहून त्यांनी त्यांना मदतनीस म्हणून सोबत घेतले. पुढे 'प्रेमा तुझा रंग कसा' या नाटकाद्वारे 'कलावैभव' या नाट्य संस्थेचा उदय झाला. या नाटकात व्यवस्थापक म्हणून त्यानी काम केलं. सोबतच रंगभूमीवरील बारीक सारिक गोष्टी शिकण्याला त्यांनी प्राधान्य दिलं. त्यानंतर काचेचा चंद्र या नाटकाच्या प्रयोगावेळी अभिनेते जयंत सावरकर यांना दौऱ्यावर जाण्यासाठी सुट्टी मिळाली नाही. त्यामुळे ऐनवेळी लीलाधर कांबळी यांना त्यांची भूमिका करावी लागली आणि व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे पदार्पण झाले. या नाटकात डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत काम करायची संधी त्यांना मिळाली. लागू यांचा अभिनय, शिस्त, शब्दफेक हे पाहून लीलाधर कांबळी यांनी आपली स्वतंत्र अभिनयशैली विकसित केली.
त्यानंतर मच्छिद्र कांबळी यांच्यासोबत मालवणी रंगभूमीवरचा प्रवास सुरु झाला. मच्छिद्र कांबळी यांनी कर्ज काढून वस्त्रहरण नाटकाची निर्मिती केली. या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. त्यानंतर त्यांनी चाकरमानी, केला तुका नी झाला माका, करतलो तो भोगतलो, अशी एकाहून एक सरस मालवणी नाटक केली.
हसवा फसवी या नाटकातील दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत केलेली आयोजकाची भूमिका विशेष गाजली. तर नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका यांच्यात देखील त्यांनी मुक्त मुशाफिरी केली. त्यांनी ऐन तारुण्यात साकारलेली सिहासन सिनेमातील उपोषणकर्त्या नेत्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती.
लीलाधर कांबळी यांची नाटकं
जिथे फूल उमलते, कथा नव्या संसाराची, नयन तुझे जादूगार, सगळे मेले सारखेच, विमानहरण, चला घेतला खांद्यावर, शहाण्यांनी खावं बसून, अशी ही फसवाफसवी, लफडं सोवळ्यातलं, चंपू खानावळीण (मालवणी)
दिग्दर्शित केलेली नाटकं
केला तुका नि झाला माका, वात्रट मेले, चाळगती, मालवणी सौभद्र, तुझ्यात नि माझ्यात, सगळे मेले सारखेच
दूरदर्शनसाठी केलेली नाटकं -
सभ्य गृहस्थ हो, हसत हसत फसवूनी, रमल रफू, शिकार
दूरदर्शन मालिका -
भाकरी आणि फूल, गोटया, बे दुणे तीन, पाऊस मृगाचा पडतो, कथास्तु, पोलिसातला माणूस, गिनीपिग, हसवणूक, सोनबाची शिदोरी, मेवालाल (हिंदी), नन्हे जासूस (हिंदी), महाबली, कॅलिडोस्कोप, मिसळ, हाऊस-मौज, कॉमेडी डॉट कॉम, थोरला हो, सांजभूल, दिशा, चला बनू या रोडपती, ही चाळ कुरूकुरू, एक वाडा झपाटलेला, गंगुबाई नॉन मॅट्रिक, भाग्यविधाता, गुण्यागोविंदाने, एक झोका नियतीचा टेलिफिल्म्स गणूराया, काज, कॅप्टन परत आलाय, धर्मा रामजोशी
चित्रपट -
सिंहासन, हल्लागुल्ला, रंगत संगत, आई पाहिजे, सारेच सज्जन, जिगर, बरखा सातारकर, प्राण जाये पर शान न जाय, श्वास, बीज (हिंदी), सविता बानो, हंगामा, वन रूम किचन, सुकन्या