मुंबई - काँग्रेसने वेळोवेळी मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आरक्षण देण्याचा मुद्दा असो किंवा औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे असो, या सर्व मुद्द्यांवर काँग्रेसने मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे मराठा समाजात संतापाची लाटा पसरली असून उद्यापासून काँग्रेस विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चेचे समन्वयक अंकुश कदम यांनी दिला. तसेच यावेळी शिवसेनेनेही आपले हिंदुत्त्व सिद्ध करावे, असे आवाहन कदम यांनी केले आहे. तसेच आता मराठा समाज ओबीसींमधूनच आरक्षण घेणार, असा इशारा कदम यांनी दिला आहे.
काँग्रेसचे मुळ मुस्लीम -
मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास विरोध केला आहे. क्रूर औरंगजेबाने आमच्या आया बहिणींची अब्रू लुटली आहे. त्याचे नाव बदलण्याची मागणी गेले ३० वर्ष केली जात आहे. शिवप्रेमींनीही तीच मागणी केली. मात्र, काँग्रेसचे मुळ हे मुस्लीम असल्याने त्यांना खुश करण्यासाठी थोरात प्रयत्न करत आहेत. त्यामुळे थोरातांनी वरिष्ठांचे तळवे चाटणे बंद करावे, असे आवाहन कदम यांनी केले.
तर सेनेने हिंदुत्त्व सिद्ध करावे -
राज्यातील सरकारमध्ये शिवसेना हिंदुत्त्व म्हणून वावरत असते. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत सामनामधून वारंवार आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नका, असे सांगत असतात. परंतु आता शिवसेनेला हिंदुत्त्व सिद्ध करण्याची संधी आहे. शिवसेनेने जर औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले नाही, तर शिवेसनेने हिंदुत्त्व सोडावे, असे कदम म्हणाले.
ओबीसीमधूनच मराठा आरक्षण -
मराठा समाजाला इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे, अशी मागणी याआधी केली जात होती. मराठा समाजाला मागासवर्ग आयोगाने मागासवर्ग मानले असून त्यामुळे आरक्षण मिळाले आहे. हे आरक्षण विधिमंडळ आणि उच्च न्यायालयात टिकले होते. मात्र, आघाडी सरकारने हे आरक्षण हिरावून घेतले. मराठा समाजाचे नेते संभाजी महाराज मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेले असता आर्थिक मागासवर्गामधून आरक्षण देणार नाही, असे सांगण्यात आले. मात्र, काही दिवसांत आर्थिक मागासवर्ग प्रवर्गातून आरक्षण देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप कदम यांनी केला. तसेच मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावे, यासाठी येत्या चार ते पाच दिवसांत राज्यस्तरीय बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अशोक चव्हाण जबाबदार -
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असून याला सर्वस्वी अशोक चव्हाणच जबाबदार आहेत. आरक्षणाबाबत तज्ञांबरोबर चर्चा करा, असे सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले. आरक्षणाच्या प्रत्येक बैठकीला वेगवेगळ्या लोकांना बोलावून समाजात संभ्रम निर्माण केला. मराठा क्रांती मोर्चामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आर्थिक मागासवर्गामधून आरक्षण लागू करणार नाही, असे सांगूनही आर्थिक मागासवर्गामधून आरक्षण लागू केले, असे कदम म्हणाले.