मुंबई - आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला असताना, राज्यभरातून वेगवेगळ्या स्तरावर आंदोलने करण्यात येत आहेत. मराठा समाजाला मागील भाजपा सरकारने दिलेले आरक्षण कोर्टात टाकले नसल्याने राज्य सरकारने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. घटनापीठ स्थापन करून लवकरात लवकर आरक्षण मिळावे अशी मराठा समजाची मागणी आहे. त्यासाठी काल (शनिवार) मुंबईत वांद्रे येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आज (रविवार) वरळीतील जांभोरी मैदान येथून मोर्चा काढला गेला आहे. या मोर्चाचे वरळी, दादर, बांद्रा, खार दांडा, सांताक्रूझ येथे सभेत रुपांतर होणार आहे.
मशाल मोर्चा
शनिवारी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मशाल मोर्चा काढण्यात आला होता. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात आला होता. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'मातोश्री'वर सुरक्षेच्या कारणास्तव मशाल मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही परवानगी झुगारुन हा मोर्चा काढण्यात आला होता.