मुंबई: मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, असा सर्वपक्षीय बैठकीत बुधवारी ठराव करण्यात आला. मात्र, मनोज जरांगे यांनी सर्वपक्षीय बैठकीतील ठरावाला दाद दिली नाही. बुधवारी रात्रीपासून त्यांनी पाणी पिण्यास नकार दिला. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरुच राहिल्यानं मराठा आंदोलक दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहेत. सरकारचे शिष्टमंडळ दहा वाजता जरांगे पाटील यांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात मंत्री अतुल सावे, आमदार संदिपान भुमरे आणि भाजपा आमदार नारायण कुचे यांचा समावेश आहे.
Live Updates:
- मराठ्यांना टिकणारं आरक्षण देण्यासाठी काही कायदेशीर बाबी तपासायला हव्यात, त्यासाठी वेळ द्या अशी विनंती निवृत्त न्यायमूर्तींनी जरागें पाटलांना केली आहे.
- जरांगेच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक उपोषणस्थळी दाखल झाले आहे. मात्र, जरांगे यांनी तपासणी करून घेण्यासाठी नकार दिला आहे.
- बीडमध्ये हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी १०१ जणांना अटक केली.
- सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येत आहे.
- नागपुरात सकल मराठा समाजाकडून गांधीगिरी करत आंदोलन सुरू आहे.
- नाशिकच्या चांदोरी चौफुली येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
बुधवारी दिवसभरात काय घडलं?
- नांदेड जिल्हयात आंदोलनाला हिंसक वळण लागले असताना नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यावर आंदोलकांनी दगडफेक केली होती. यात जिल्हा पोलिस अधीक्षक कोकाटे जखमी झाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या 50 आंदोलकांना अटक केली आहे. अटकेतील आंदोलकांचा आकडा वाढू शकतो, अशी माहिती उप जिल्हा अधीक्षक अभिलाश कुमार यांनी दिली आहे.
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आमदारांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतलं होतं. तब्बल 40 मिनिटानंतर साडेबारा वाजता या 23 आमदारांना सोडण्यात आले असल्याची माहिती आझाद मैदान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किसन मापारी यांनी दिली आहे.
- मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आरक्षण मागणीच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज पवईच्यावतीने बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. पवई येथील आय आय टी मेनगेट समोर आणि डिलाईल रोड येथील एन एम जोशी मार्ग मुन्सिपल शाळेबाहेरील रस्त्यावर हे आंदोलन सकाळी ९.३० वाजता करण्यात आले. यावेळी डिलाईल रोड आणि पवई परिसर ’एक मराठा लाख मराठा‘ तसेच ’आरक्षण आमच्या हक्काचे...‘ या घोषणांनी दणादणून निघाला.
- मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं बुधवारी दुपारी अचानकपणे सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापुरातील मराठा समाज आक्रमक झालेला आहे. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निषेध करत सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. केंद्र व राज्य सरकारचे प्रतिकात्मक फलक पेटवून दिला. राज्य सरकारनं ताबडतोब परिपत्रक काढून समाजाला आरक्षण द्यावं अशी प्रमुख मागणी केली आहे.
- मराठा समाजाला आरक्षण प्रश्नी राज्यात ठिकठिकाणी दोलनाला हिंसक वळण लागल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. मात्र या सर्वपक्षीय बैठकीत मराठा आरक्षणासंबंधी कोणताही तोडगा निघाला नाही. मराठा आंदोलनाच्या प्रश्नाला खऱ्या अर्थान उत्तर शोधणार नाही, तोपर्यंत हा विषय मार्गी लागणार नाही. न्या.संदीप शिंदे समितीचा अहवाल गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात संबोधित करत नाही, असे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी सांगितले.
हेही वाचा-