मुंबई - गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणावरून वाद विवाद पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण न्यायालयात प्रलंबित आहे. आरक्षणासाठी सरकार नीट बाजू मांडत नसल्याचा आरोप वेळोवेळी मराठा समाजातील नेत्यांनी केला आहे. त्यात आता मराठा क्रांती मोर्चाचे समनवयक आबा पाटील यांनी थेट महाराष्ट्रातील नेत्यांची नाव घेऊन मराठा आरक्षणाला यांचा विरोध आहे असा आरोप केला आहे.
या नेत्यांचा मराठा आरक्षणाला विरोध -
मराठा आरक्षणाबद्दल लिहिताना आबा पाटील यांनी म्हटले की, पटोले, वडेट्टीवार, भुजबळ, दोन्ही मुंडे, शेंडगे हेच लोक मराठा आरक्षणावर बाहेरून आमचा विरोध नाही म्हणणारे आतून मराठा आरक्षणाचे कट्टर विरोधक आहेत. केवळ यांच्यामुळेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना त्रास होत आहे, असे म्हटले आहे.
हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंबईत मोर्चा -
महावितरणमध्ये मराठा उमेदवारांना डावलून उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतला. त्यासाठी मराठा समाजाने 1 व 2 डिसेंबरला प्रत्येक जिल्ह्यात अधिक्षक कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले होते. त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रभरातील मराठा समाजाकडून मुंबई येथे लॉंग मार्च काढण्यात येणार, अशी माहिती मराठा समाज समन्वयकांनी दिली आहे.
मराठा बांधवांचा संताप -
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाकडून आंदोलन-मोर्चे होत आहेत. पण सरकार याची दखल घेत नसल्याने मराठा बांधव संतापला आहे. मराठा आरक्षण, पदभरती, शिक्षणप्रवेश, 2014 ते 2020 प्रलंबित शासकीय नियुक्ती उमेदवार प्रश्न, शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुपर न्युमररी, अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यान्वित करणे असे अनेक प्रश्न शासनाने सोडवले नसल्याने मराठा तरुण आक्रमक झाला आहे.
हेही वाचा - मराठा विकास प्राधिकरण स्थापनेच्या विरोधात कर्नाटक बंद; कन्नड संघटनांचा पुढाकार