मुंबई - महावितरण कंपनीअंतर्गत निघालेल्या पदभरतीत एसई बीसीमधून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण द्यावे किंवा आरक्षण मिळेपर्यंत भरती थांबवावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आज (मंगळवारी) वांद्रे येथील महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने अधिकाऱ्यांना याविषयी निवेदन देण्यात आले. तसेच ही पदभरती थांबवा, अशी मागणी करण्यात आली.
मराठा समाज अस्वस्थ -
महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व नोकरी प्रवेश प्रक्रियेत डावलून इतरांसाठी प्रक्रिया सुरू केल्याप्रकरणी मराठा समाज अस्वस्थ आहे. महावितरण कंपनीअंतर्गत उपकेंद्र सहाय्यक या पदाकरिता जाहिरात क्र. 05 / 2019 नुसार उमेदवार निवड यादीचे प्रत्यक्ष पडताळणी दिनांक 1 व 2 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. या भरतीमध्ये मराठा एसईबीसी आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना समाविष्ट करण्यात आलेले नाही. तरी पदभरती करण्यात येत आहेत. यामुळे मराठा समाज नाराज, अस्वस्थ झाला आहे.
हेही वाचा - बॉलिवूडला कोणी मुंबईबाहेर नेऊ शकत नाही - चंद्रकांत पाटील
आरक्षण मिळेपर्यंत तीव्र आंदोलन सुरूच राहणार -
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत भरती होणार नाही, असे शासनाने दिलेले आश्वासन त्यांनी न पाळता महावितरण पदभरती पडताळणी सुरू ठेवली आहे. ज्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण न देता सामान्य जागातून ही भरती करून विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहे. त्यामुळे ही भरती एकतर थांबवावी किंवा एसबीसीमधून मराठा विद्यार्थ्यांची नेमणूक करा, तसेच वयोमर्यादा वाढवा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चा महामुंबईच्या वतीने आज आम्ही आंदोलन व आमच्या शिष्टमंडळाने महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करत निवेदन दिले. यावर अधिकारी सकारात्मक होते. जर पदभरती सुरूच ठेवली तर आता जस सर्वत्र आंदोलन होत आहेत, तशीच आंदोलन पुढे तीव्र होतील, असे मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक वीरेंद्र पवार यांनी सांगितले. दरम्यान, या ठिकाणी मोठयाप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.