मुंबई : Mantralaya New Security : मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड आहे. मात्र, आता मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येवर राज्य सरकार मर्यादा घालणार आहे. त्यासह मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना आता ताटकळत बसावं लागू नये, यासाठी लवकरच ऑनलाईन पास देण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. त्यामुळं मंत्रालयात (Maharashtra Mantralaya) भेट देणाऱ्या नागरिकांना लवकरच ऑनलाईन पास देण्यात येणार आहेत. याबाबतच्या सूचना मंत्रालयातील उपसचिव चेतन निकम यांनी परिपत्रक काढून दिल्या आहेत.
मंत्रालयात भेट देणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा : मंत्रालयात भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड असल्यानं व्यवस्थेवर ताण येत आहे. दररोज मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या तब्बल तीन ते साडेतीन हजार आहे. त्यातही मंत्रिमंडळाची बैठक असल्यास ही संख्या तब्बल 5 हजाराच्या वर जाते. त्यामुळं त्याचा ताण प्रशासनावर आणि मंत्रिमंडळावरही येतो. त्यामुळं ही संख्या मर्यादित करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळं मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात येणार आहे.
नागरिकांना मिळणार ऑनलाईन पास : मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना रांगेत उभं राहून पाससाठी ताटकळावं लागतं. त्यामुळं मंत्रालयाच्या दारासमोर मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळते. त्यामुळं मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना 15 दिवसात ऑनलाईन पास उपलब्ध करुन देण्यात येण्याच्या सूचना मंत्रालय उपसचिवांनी दिल्या आहेत. नागरिकांना लवकरच मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी ऑनलाईन पास मिळणार आहेत.
मंत्रालयात बसवणार फ्लॅप बॅरियर : मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्यानं मंत्रालय इमारतीत मोठी गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांवर मर्यादा घालणं गरजेचं आहे. त्यातही एका विभागात काम असलेले नागरिक काम नसतानाही मंत्रालयातील दुसऱ्या विभागात फिरत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे या नागरिकांवर आळा घालणं गरजेचं आहे. अशा नागरिकांना रोखण्यासाठी आता ज्या विभागात काम आहे, त्याच विभागाचा पास नागरिकांना देण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रालयात फ्लॅप बॅरियर बसवण्याच्या सूचना उपसचिव चेतन निकम यांनी दिल्या आहेत. त्यामुळं एका विभागाचा पास असलेल्या नागरिकांना इतर विभागात फिरता येणार नाही.
मंत्रालयात होणार अद्ययावत व्हिजिटर प्लाझा : मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पास न मिळाल्यानं अनेकदा ताटकळत राहावं लागतं. काही वेळेस पास मिळूनही मंत्र्यांकडं असलेल्या गर्दीमुळे थांबावं लागतं. त्यामुळे अशा नागरिकांसाठी आता मंत्रालयात अद्ययावर व्हिजिटर प्लाझा तयार करण्यात येणार आहे. यासाठी मंत्रालयातील गार्डन गेटजवळील मोकळ्या जागेत बॅग स्कॅनर, व्हिजिटर वेटींग रुम, लॉकर, पास काऊंटर आदी सुविधा देण्यात तयार करण्याच्या सूचनाही मंत्रालय उपसचिव चेतन निकम यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा :