नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (26 नोव्हेंबर) त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'च्या 107 व्या आवृत्तीला संबोधित केलं. ते म्हणाले की, आजचा 26 नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशाला घाबरवलं होतं. पण त्या हल्ल्यातून आपण सावरलो. आता पूर्ण धैर्यानं दहशतवादाचा पाडाव करत आहोत, ही भारताची ताकद आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, मुंबई हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावलं त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आजचा दिवस 26 नोव्हेंबर हा आणखी एका कारणासाठीही खूप महत्त्वाचा आहे. १९४९ या दिवशी संविधान सभेनं भारतीय राज्यघटना स्वीकारली. ते म्हणाले की, मी सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या खूप शुभेच्छा देतो. नागरिकांच्या कर्तव्याला प्राधान्य देऊन आपण सर्व मिळून विकसित भारताचा संकल्प नक्कीच पूर्ण करू.
महिलांच्या हक्क आणि न्यायासाठी आवाज उठवला : पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाची वेळ, परिस्थिती आणि गरज लक्षात घेऊन वेगवेगळ्या सरकारनं वेगवेगळ्या वेळी सुधारणा केल्या आहेत. पण राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती ही भाषणस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांवर गदा आणणारी होती हेही दुर्दैवी होते. 44 व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आणीबाणीच्या काळात झालेल्या चुका सुधारण्यात आल्या आहे. संविधान सभेचे काही सदस्य नामनिर्देशित करण्यात आले होते, त्यापैकी 15 महिला होत्या. त्यामधील हंसा मेहता यांनी महिलांच्या हक्क आणि न्यायासाठी आवाज उठवला होता. त्या महिलांना संविधानानं मतदानाचा अधिकार देणाऱ्या मोजक्या देशापैकी भारत देश होता.
गेल्या काही दिवसांत देशात दिवाळी,भाऊबीज आणि छठ या सणांवर 4 लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय झाला आहे. या काळात भारतात बनवलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. व्होकल फॉर लोकलची ही मोहीम संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था मजबूत करते. वोकल फॉर लोकल अभियान ही रोजगाराची हमी आहे. दिवाळीनिमित्त रोख रक्कम देवून काही वस्तू खरेदी करण्याचा ट्रेंड हळूहळू कमी होत असताना हे सलग दुसरे वर्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणजेच आता लोक अधिकाधिक डिजिटल पेमेंट करत आहेत. हे देखील खूप उत्साहवर्धक आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
- पंतप्रधानांचा मासिक रेडिओ कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू झाला. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ न्यूज वेबसाइट, न्यूज ऑन एअर मोबाइल अॅप आणि नरेंद्र मोदी मोबाइल अॅपच्या संपूर्ण नेटवर्कवर प्रसारित केला जातो. पंतप्रधान मोदींच्या मासिक रेडिओ कार्यक्रमानं 100 वा भाग पूर्ण केला होता.
हेही वाचा :