मुंबई - पूर्व उपनगरातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका मनिषा रहाटे यांनी अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची परवानगी पालिका प्रशासनाने सभागृहाकडे मागितली. सभागृहात या प्रकरणी राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी रहाटे यांची बाजू मांडत ही मागणी चुकीची असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. यामुळे सभागृहाने ही मागणी फेटाळून लावत रहाटे यांना तूर्तास दिलासा दिला आहे.
मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रोळी येथील वॉर्ड क्रमांक ११९ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा रहाटे निवडून आल्या होत्या. यावेळी विक्रोळी, हरियाली व्हिलेज येथील यशवंत कॉलनीमधील त्या राहत असलेल्या घराचे बांधकाम चालू होते. त्यासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे या बेकायदा बांधकामावर पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी सुनीता हांडे यांनी २ मार्च २०१७ ला पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली होती. अशाच प्रकारची तक्रार हांडे यांनी २५ एप्रिल २०१७ ला करुन रहाटे यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.
हांडे यांनी याप्रकरणी रहाटे यांच्या विरोधात लघुवाद न्यायालयात (६०/२०१७) याचिका दाखल केली होती. या याचिकेत अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तसेच हांडे यांनी उच्च न्यायालयातही रिट याचिका (२२२२/२०१८) दाखल केली होती. त्यावर संबंधितांविरोधात काय कारवाई केली याची माहिती पालिकेने तक्रारदार महिलेला द्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. रहाटे यांना अपात्र ठरवण्यासाठी लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे अर्ज दाखल करण्यासाठी महापालिकेची मान्यता मिळावी, अशी विनंती पालिका प्रशासनातर्फे सभागृहाला करण्यात आली होती.
याबाबतचा प्रस्ताव आज पालिका सभागृहात मंजुरीसाठी आला असता रहाटे यांच्यावर आरोप असलेले बांधकाम त्या नगरसेवकपदावर निवडून येण्याच्या आधीचे आहे. या अनधिकृत बांधकामाला पालिकेने ३५१ कलमानुसार नोटीस दिली आहे. मात्र, ती नोटीस रहाटे यांच्या नावे दिलेली नाही. तसेच या प्रकरणी शहर दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. प्रशासन सभागृहाची दिशाभूल करत असल्याने रहाटे यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याच्या मागणीच्या प्रस्ताव दफ्तरी दाखल करावा, अशी मागणी राखी जाधव यांनी उपसूचनेद्वारे केली. महापौरांनी ही उपसूचना मतास टाकली असता एकमताने ही उपसूचना मंजूर झाल्याने तूर्तास रहाटे यांचे नगरसेवक पद वाचले आहे.