मुंबई -पोलिसांनी पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा आज पहाटे एन्कांऊंटर केला. पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी केलेले काम समाधानकारक आहे. मात्र, न्याय व्यवस्थेवरील विश्वास टिकून राहावा यासाठी पोलिसांनी केलेल्या या एन्काऊंटरची चौकशी व्हावी, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी दिली आहे.
आज एका निर्भयाला न्याय मिळाल्याचे समाधान आहे. याचप्रकारच्या इतर घटनेतील मुलींच्या पालकांना आमच्या निर्भयाला केव्हा न्याय मिळणार, असे वाटत असेल. अशा प्रकरणात न्याय मिळण्यासाठी विलंब होतो, त्यामुळे असे खटले जलद निकाली काढावे, असे मनीषा कायंदे म्हणाल्या.
पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तेलंगणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. मोहम्मद आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी आरोपींची नावे होती. शुक्रवारी आरोपींना पोलिसांनी तपासासाठी घटनास्थळी नेले होते. तेव्हा आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केले.