मुंबई - शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सर्वत्र लॉकडाऊन असल्याने मुंबईतील मजूर आणि कामगारांचे हाल होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असतानाही पायी चालत जीव धोक्यात घालून अनेक नागरिक घरी निघाले आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या अशाच एका व्यक्तीला भरधाव वेगातील ट्रेलरने धडक दिली. यात त्या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला.
मंगळवारी दुपारी पूर्वद्रुतगती मार्गावरील भांडुप येथे एका व्यक्तीला भरधाव ट्रेलरने धडक दिली. दुपारच्या सुमारास ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी या मार्गावरून ठाण्याच्या दिशेने अनेक वाहने जात होती. मात्र, एकाही वाहन चालकाने रस्त्याच्या मधोमध पडलेल्या इसमाची मदत केली नाही. 15 ते 20 मिनिटे हा मृतदेह रस्त्याच्या मधोमध पडून होता. त्यानंतर एका दुचाकीस्वाराने यासंदर्भात पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून हा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. दरम्यान, यासंदर्भात विक्रोळी पोलिसांनी ट्रेलर चालकाचा विरोधात गुन्हा दाखल केला असून चालकाला ताब्यात घेतले आहे.
मुंबई शहर व उपनगरात कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढत असल्याने असंघटित व मजूरी करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 3 मे ला लॉकडाऊन संपणार की, पुढे कायम राहणार याचा शाश्वती नाही. त्यामुळे मुंबई बाहेर चालत किंवा मिळेल वाहनाने धोका पत्करून गावी जात आहेत.