मुंबई - डिजिटल समाज माध्यमांचा वापर दिवसेंदिवस वाढत असतानाच त्याद्वारे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. नेट बँकिंगच्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार आणि त्याद्वारे होणारे गुन्हे, समाज माध्यमांवर बदनामी करणे, लोकांना बँकेतून बोलतोय, असे सांगून त्यांच्या खात्यातील रक्कम हडप करणे, एटीएम कार्ड क्लोनिंग सारखे गुन्हे रोजच घडत असतात. मात्र, आता 'मॅन इन द मिडल अटॅक' नावाच्या सायबर हॅकिंगच्या नव्या गुन्ह्यांमुळे सायबर व्यवहार खरोखरच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीला मान्यता
सायबर गुन्ह्यांच्या विश्वात सध्या 'मॅन इन द मिडल अटॅक' नावाच्या गुन्ह्याचा प्रकार सध्या खूपच चर्चेत आहे. वेगवेगळ्या समाज माध्यमांच्यावापरा दरम्यान दोन व्यक्तींमध्ये होणारा संवाद हा संबंधित खाते हॅक करून तिसरा व्यक्ती पाहतो. या प्रकारच्या गुन्ह्यात कॉर्पोरेट सारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या डिजिटल पैशांचे व्यवहार लक्ष्य केले जातात. मेल हॅकिंग, नेट बँकिंग डाटा लिक करणे किंवा व्हॉटस अॅप सारख्या माध्यमांवर लक्ष ठेवून सायबर गुन्हे घडत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या खात्यातून 90 कोटी रुपये लुटले होते, तर मुंबईतील बँक ऑफ मॉरिशसच्या खात्यातूनही 100 कोटी रुपये अज्ञात सायबर हल्लेखोरांनी लुटले होते.
हेही वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची 100 फुटांनी वाढणार, मंत्रिमंडळाची मान्यता
राज्यात 2015 साली एकूण 2195 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2016 साली 2880 सायबर गुन्हे नोंद आहेत. 2017 ला सायबर पोलिसांकडे एकूण 4053 गुन्हे नोंदवण्यात आलेत. तर 2018 साली 4500 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2019 वर्षात पोलिसांकडे 2900 गुन्हे सायबर क्राईमचे नोंदवले गेले आहेत. 2018 साली सायबर गुन्ह्यात लुटलेली रक्कम ही जवळपास 207 कोटी 41 लाख रुपये इतकी आहे. तर 2019 साली जवळपास 268 कोटी रुपये लुटल्याची माहिती समोर आली आहे.