नवी मुंबई : Man Beaten Woman Teacher : अश्लील मेसेज (Vulgar Messages) केल्याची तक्रार केल्याच्या रागातून एका नराधमानं शिक्षिकेला जबर मारहाण (Man Beaten Teacher) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर कामोठे पोलीस ठाण्यात (Kamothe police station) गुन्हा नोंद करण्यात आलाय. तर अद्याप आरोपीला अटक झालेली नाही. पीडित महिला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून, न्यायाची याचना करीत आहे.
शिक्षिकेला पाठवले अश्लील मेसेज : 22 वर्षीय भावाचे निधन झाल्याने पीडित महिलेचे वयोवृद्ध आई-वडील एकटे पडले होते. पीडित महिला आईवडिलांची काळजी घेता यावी म्हणून आई-वडील राहत असलेल्या इमारतीत दोन वर्षांपूर्वी आपल्या पती व मुलांसह भाडेतत्त्वावर राहण्यासाठी आली होती. जेव्हापासून संबंधित महिला इमारतीत आली तेव्हापासून त्याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहणारा सन्नी कलमात कांडी वासू (40) हा संबंधित महिलेवर वाईट नजर ठेवून होता. तो वारंवार महिलेला अश्लील हावभाव करून, छेड काढीत होता. त्याने महिलेचा मोबाईल क्रमांक शोधून तिला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.
कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार : सदर प्रकारामुळे महिला घाबरून गेली होती. तिनं हा प्रकार पती, आई-वडील तसेच सन्नी वासू याच्या वडिलांना कळवला होता. त्याचप्रमाणे त्याची तक्रार सोसायटीमध्ये तसेच कामोठे पोलीस ठाण्यात केली. यामुळे सन्नी वासू याला महिलेचा प्रचंड राग आला. त्यामुळे तो महिलेवर सतत खुन्नस काढत असे व तिच्यासोबत भांडण करीत असे.
महिलेला घरात घुसून केली जबर मारहाण : 21 ऑक्टोंबरला पीडित महिला व तिची बारा वर्षेीय मुलगी अशा दोघीच घरात होत्या. सन्नी वासू याने महिलेचा दरवाजा जोरजोरात वाजवण्यास सुरुवात केली. दरवाजा उघडल्यावर तुमच्या घरातून जोरजोरात आवाज येतो असे खोटे कारण सांगून महिलेशी भांडण करण्यास सुरुवात केली. थांब तुझा आवाज बाहेर काढतो, असे देखील त्याने म्हंटलं व पीडित महिलेला जबर मारहाण केली. या मारहाणीत महिलेला जबरदस्त रक्तस्त्राव झाला आहे. त्याचबरोबर तिच्या तोंडाला देखील टाके पडले आहेत. पीडित महिला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहे. सन्नी वासू याच्या विरुद्ध कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, अजूनही पोलिसांनी त्याला अटक केलेले नाही.
हेही वाचा -