मुंबई - मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय असे सांगून फसवणूक करणाऱ्या एका गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. हा गुन्हेगार व्यापारी व्यवसायिक यांना फोन करून आपण मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून वस्तू घ्यायचा, आणि पैसे मुख्यमंत्री कार्यालयातून ऑनलाइन पेमेंट होईल असे सांगायचा. मात्र, प्रत्यक्षात असे काही नव्हते, अशाच एका व्यापार्याची फसवणूक झाल्याबद्दलची तक्रार मिळताच पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. भालिंदर सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मुंबई, नवी मुंबई आणि इतर परिसरातल्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भालिंदर सिंह या मास्टर माईंड गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी भालिंदर हा व्यापाऱ्यांना फोन करून मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून लॅपटॉप आणि मोबाइल खरेदी करत होता. मात्र, पैशांची देवाण-घेवाण न करता ते सीएम ऑफिसकडून इंटरनेट बँकिंगद्वारे पाठवले गेले आहेत, असे बनावट मेसेज तयार करून व्यापाऱ्यांना पाठवत होता. मात्र, प्रत्यक्षात असे कोणतेही पैसे व्यापाऱ्यांना मिळत नव्हते.
हेही वाचा - गोव्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी साकारलेला 'संभाजी' तुम्ही पाहिलात का..?
अशाप्रकारे त्याने आणखी एका व्यापाऱ्याची फसवणूक केली. आरोपीने लॅमिंग्टन रोड येथील एका दुकानदाराला फोन केला. त्याला मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय असे सांगून त्याने तब्बल ४८ हजारांचा एक आयफोन आणि ३३ हजारांचा लॅपटॉपसुद्धा विकत घेतला. या साहित्याचे पैसे इंटरनेट बँकिंगद्वारे तुमच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत, असा बनावट मेसेजसुद्धा त्याने त्यांच्या फोनवर पाठवला. व्यापाऱ्याला खात्री पटल्याने त्यांनी हे साहित्य आरोपीने दिलेल्या पत्त्यावर पाठवले. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही पैसे खात्यात आले नसल्याचे कळताच या व्यापाऱ्याने मुंबई पोलिसांच्या डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून त्याला नवी मुंबई परिसरातून अटक केली आहे. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे असल्याचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले.
हेही वाचा - 'फसवणूक करून सत्तेत आलेल्या सरकारची कर्जमाफी देखील फसवीच'