मुंबई - मुंबईत कोरोनाची भीती असताना आता मलेरियाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पण त्याचवेळी एक सकारात्मक बातमी अशी, की गेल्या वर्षीच्या तुलनेत स्वाइन फ्लू, कावीळ, लेप्टो, गॅस्ट्रो अशा साथीच्या आजारांमध्ये मोठी घट झाली आहे. ही दिलासादायक बाब असली तरी गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. त्यामुळे आता लेप्टो आणि इतर आजार बळावण्याची शक्यता आहे. तेव्हा मुंबईकरांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी साथीच्या आजारात मोठी घट झाल्याचे दिसते. दिलासादायक बाब म्हणजे यंदा जुलैमध्ये स्वाइन फ्लूचा एक ही रुग्ण आढळलेला नाही. जेव्हा की जुलै 2019 मध्ये 123 रुग्ण आढळले होते तर यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. तर, गेल्या वर्षी जुलै 2019 मध्ये लेप्टोचे 74 रुग्ण आढळले होते तर 5 रुग्ण दगावले होते. यंदा मात्र, हा आकडा 14वरच अडकला असून एकही रुग्ण दगावलेला नाही. त्याचवेळी स्वाईन फ्लूचे 123 रुग्ण आढळले होते आणि एक रुग्ण दगावला होता. यंदा जुलैमध्ये मात्र स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तर जुलै 2019मध्ये गॅस्ट्रोचे तब्बल 994 रुग्ण आढळले होते. तिथे यंदा, जुलै 2020मध्ये केवळ 53 रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी काविळचे 270 रुग्ण होते तिथे यंदा केवळ एक रुग्ण आहे. त्याचवेळी डेंग्यूही कमी झाला आहे. गेल्या वर्षी डेंग्यूचे 29 रुग्ण आढळले होते. पण, यंदा मात्र डेंग्यूचे फक्त 11 रुग्ण आहेत. एकूणच मलेरिया वगळता इतर साथीचे आजार कमी झाले आहेत.
पावसाळ्यात साफसफाई न झाल्याने मलेरिया वाढला आहे. तर दुसरीकडे मुंबईकर कोरोनाच्या भीतीने स्वतः ची काळजी घेत आहेत. घरातून बाहेर पडत नसल्याने पावसात भिजत नसल्याने, अनवाणी फिरत नसल्याने लेप्टो कमी झाला आहे. तर बाहेरचे खाणे बंद असल्याने आणि उकळलेले-गरम पाणी मोठ्या प्रमाणावर पिण्यासाठी वापरले जात असल्याने गॅस्ट्रो-कावीळ आजार कमी झाला आहे, अशी माहिती डॉ अनिल पाचनेकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी दिली आहे. ही दिलासादायक बाब असली तरी आता अनलॉकमध्ये फूड स्टॉल सुरू झाल्याने लोकं बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ लागले आहेत. तेव्हा कावीळ-गॅस्ट्रो वाढू शकतो. तर, तीन दिवस मुंबईची तुंबई झाली असून अनेकजण पाण्यात चालत आहेत. अशात आता लेप्टो वाढू शकतो अशी भीती डॉ. पाचनेकर यांनी व्यक्त केली आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनीही आता लेप्टो बळावण्याची भीती व्यक्त केली आहे. मागील तीन दिवसात जे कुणी पावसाच्या पाण्यात चालले असतील त्यांनी त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्सि गोळी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. तर, पावसाळ्यातील साथीच्या आजारांसह कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.