मुंबई Sheetal Mhatre : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची तयारी सुरू आहे. शिवसेना शिंदे गटानंही आपल्या नेत्यांना जबाबदारीचं वाटप सुरू केलं आहे. शिवसेनेतील आघाडीच्या प्रवक्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शीतल म्हात्रे यांच्यावर कोकण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, कोकणातील खेड मतदार संघातील आमदार योगेश कदम यांच्यावर मुंबई विभागातील जबाबदारी देण्यात आली आहे.
शितल म्हात्रे नाराज : वास्तविक योगेश कदम यांचा मतदारसंघ तसंच संपर्क कोकणात असताना त्यांना मुंबईची जबाबदारी सोपवण्याचं गणित अनेकांना समजलं नाहीये. मुंबईत काम करण्याचा अनुभव असलेल्या शीतल म्हात्रे यांच्याकडं कोकणाची जबाबदारी सोपवल्यानं शीतल म्हात्रे नाराज झाल्याची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटात ज्योती वाघमारे यांची प्रवक्ते पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. त्या तुलनेत शितल म्हात्रे यांना सध्या कमी महत्त्व मिळत आहे. त्यामुळं आधीच दुखावलेल्या शितल म्हात्रे आता अधिकच दुखावल्या आहेत, अशी चर्चा पक्षातील कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे.
'मी' दुखावलेली नाही : या संदर्भात बोलताना शीतल म्हात्रे मात्र म्हणाल्या की, शिवसेना शिंदे गटात सर्व नेत्यांवर योग्य जबाबदारी सोपवली जाते. मुंबई ही कोकणातच येते, असं आपण सर्व मानतोच. त्यामुळं 'मी' जराही नाराज नाही. पक्षानं दिलेली जबाबदारी मी समर्थपणे सांभाळेल, असं त्या म्हणाल्या.
शिंदे गटात नाराजीचा प्रश्न नाही : या संदर्भात बोलताना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर म्हणाले, शिवसेना शिंदे गटात सर्वच नेते हे स्वतःहून काम करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्यावर जबाबदारी सोपवली की ते मनापासून काम करतात. याचा अनुभव आतापर्यंत आलेलाच आहे. त्यामुळं शिंदे गटामध्ये कोणीही नेते नाराज असल्याचा प्रश्न नाही. आम्ही सर्व एकसंघपणे काम करीत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सगळे प्रयत्नशील आहेत, असंही पावसकर म्हणाले.
हेही वाचा -