मुंबई : विधानसभा 2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र तरीही सत्तेपासून दूर राहायला लागल्याचे शल्य त्यांच्या उरी सतत सलत होते. म्हणूनच त्यांनी शिवसेनेमध्ये फूट पाडून एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून राज्यात नव्याने सत्ता स्थापन केली. विरोधी पक्षातील नेत्यांना केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवून त्यांना आपल्या पक्षात खेचण्याची आणि आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याची नवी पद्धत भारतीय जनता पक्षाने गेल्या काही वर्षात सुरू केली आहे.
चंदन शिरवाले यांचा दावा : भारतीय जनता पक्षात गेलेले एक तृतीयांश नेते आणि आताचे आमदार हे अन्य पक्षातून आलेले आहेत. त्यामुळे राज्यात भाजपाला सर्वाधिक जागा अन्य पक्षातून गेलेल्या नेत्यांमुळेच मिळाल्या आहेत. हे भाजपला पक्के ठाऊक आहे. म्हणूनच आता राष्ट्रवादीतही भारतीय जनता पक्षाकडून नव्या एकनाथ शिंदे यांचा शोध घेतला जात आहे. असा दावा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक चंदन शिरवाले यांनी केला आहे. शिवसेनेमधील काही नेत्यांना भीती दाखवून तर काही नेत्यांना सत्तेची लालच दाखवून पक्षातून बाहेर पडण्यास भाजपाने प्रवृत्त केले आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपच होता हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपने आता आपला मोर्चा राज्यात अधिक ताकदवान असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वळवला आहे. यापूर्वीच त्यांनी अजित पवार यांना आपल्या गळाला लावले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा अजित पवार यांच्यावर डोळा आहेच. शिवाय जयंत पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यालाही आधी अडचणीत आणून पक्षात घेण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाऊ शकतो. अशी शक्यताही शिरवाले यांनी व्यक्त केली.
भाजपा राष्ट्रवादी फोडू शकत नाही : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेते नाराज असल्याच्या केवळ अफवा उठवल्या जात आहेत. अजित पवार किंवा जयंत पाटील हे नाराज नेते नाहीत. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न जरूर केला जात आहे. अजित पवार यांच्या कारखान्यांवर तसेच जयंत पाटील यांच्या सांगली जिल्हा बँकेवर चौकशा सुरू आहेत. मात्र कितीही त्रास दिला तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपला एकनाथ शिंदे सापडणार नाहीत. भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस फोडू शकत नाही असा दावा चव्हाण यांनी केला आहे.