मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री दादाभाऊ भुसे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी एनडीए आघाडीचे हात मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातील ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने येत्या १४ जानेवारीपासून राज्यात महायुतीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याप्रसंगी दिली.
महायुतीत पक्षप्रवेशासाठी लोकांचा ओढा : येत्या १४ जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय मेळावे घेण्यात येणार आहेत. त्यानंतर तालुकास्तरावर आणि बूथस्तरापर्यंतचे मेळावे होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह महायुतीचे रामदास आठवले, विनय कोरे, महादेव जानकर, जोगेंद्र कवाडे, ज्योती मेटे आणि सर्व घटकपक्षाचे नेता उपस्थित असतील, अशी माहिती त्यांनी दिली. मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड यश मिळेल. शिंदे-फडणवीस पवारांच्या नेतृत्वात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. तसंच पक्षाच्या बळकटीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते यावेळी म्हणाले. 47 हजार 412 लोकांनी आमच्याशी संवाद साधताना मोदी हेच पंतप्रधान हवेत, असं म्हटलंय. संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या मागे उभा आहे. महायुतीत पक्षप्रवेशासाठी लोकांचा ओढा लागला आहे. येत्या काळात महाविकास आघाडीकडे केवळ नेते शिल्लक असतील, कार्यकर्ता कुणीच नसेल असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
ठाकरेंच्या लग्नात इतके लोक नव्हते : जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातील महायुतीचे ४५ खासदार उभे असतील असा विश्वासही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केलाय. तसेच, मी दाव्याने सांगतो की ४५ पेक्षा जास्त जागा महायुती जिंकेल. यावेळी मोदींचं वादळ येईल आणि मविआचा सर्व पाळापाचोळा साफ करेल असही ते म्हणाले. अनेक लोक आमच्या महायुतीत यायला तयार आहेत. एक दिवस महाराष्ट्रात असा येईल की सर्व नेते हे महायुतीच्या स्टेजवर असतील. ठाकरेंच्या लग्नात जितके लोक होते त्यापेक्षा कमी लोक काँग्रेसच्या सभेला परवा होते असा टोलाही बावनकुळे यांनी लगावलाय. त्याचबरोबर लोकसभाच नाही तर विधानसभेतही महायुती २२५ जागांवर विजयी होईल, असा मोठा दावाही त्यांनी यावेळी केलाय.
आम्हाला फक्त जिंकायचंय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , तसंच केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य असेल. आम्हांला जागा कोणाला किती याबाबत आमच्यात मतभेद नाहीत. आम्हाला फक्त जिंकायचं आहे. सिंधुदुर्गमधील जागेसाठी जे जे काही करावं लागेल ते ते आम्ही करु. केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करू, असंही बावनकुळे म्हणाले. शेवटपर्यंत प्रत्येकाला अस वाटतं की ती जागा आम्हांला मिळायला हवी. पण केंद्रीय नेतृत्व जे शिक्कामोर्तब करेल ते महत्वाचे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
त्यांना उत्तर देण्याची गरज नाही : विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाला उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, ज्यांना त्यांच्या पक्षात किंमत नाही त्यांच्यावर काय बोलायचं? त्यांना उत्तर देण्याचीही गरज नाही. शरद पवार गटाचे शिर्डी येथे शिबिर सुरू असून, या शिबिराकडे रोहित पवार यांनी पाठ फिरवली. याविषयी बोलताना सुनील तटकरे म्हणाले, "याची चिंता मला करायची गरज नाही. त्यांचे किती लोक बाहेर पडतील, हे येत्या काळात दिसेलच." असंही तटकरे म्हणाले.
हेही वाचा :
१ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज पत्रकार परिषद, जागा वाटपाचा तिढा सुटणार?
२ कारसेवकांनी बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा मी उपस्थित, काही लोक मात्र लपून बसले -देवेंद्र फडणवीस
३ कारसेवकांनी बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा मी उपस्थित, काही लोक मात्र लपून बसले -देवेंद्र फडणवीस