मुंबई : महाविकास आघाडीला एक वर्षाच्या फरकाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून दोन मोठे राजकीय धक्के बसले. मात्र, त्याचा परिणाम महाविकास आघाडीला झाला नाही, असे वारंवार मविआचे नेते सांगत आहेत. येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी देखील कामाला लागली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि सहकारी आमदारांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन आज चर्चगेट येथील एमसीए लॉंग येथे करण्यात आले आहे.
आज महत्त्वपूर्ण बैठक : महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक आज आयोजित केली आहे. मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीच्या तयारी संदर्भात यामध्ये चर्चा होणार आहे. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची असणार आहे. सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे, सामान्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. मात्र, सत्कार समारंभासाठी घोषणांमध्ये सरकारचा वेळ चालल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना एकत्र घेऊन सरकारविरोधी रणनीती आखण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत कोणतीही चर्चा नाही, या सर्व अफवा असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
'या' नेत्यांची प्रमुख उपस्थिती : या बैठकीत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड तसेच विधानपरिषदेचे सदस्य शिवसेना आमदार अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहे.
महायुतीची बैठक : येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी महायुतीने जोरदार पावले उचलल्यास सुरुवात केली आहे.महायुतीच्या आमदारांची आज महत्वपूर्ण बैठक मुंबईतील पंच तारांकित हॉटेलमध्ये संध्याकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे. यामध्ये भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट या महायुतीतील घटक पक्षातील सर्वच आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा :