मुंबई - कलाक्षेत्रात करिअर घडवायचे असेल तर तुमचे कोणीतरी या क्षेत्रात असावे लागते, मगच संधी मिळते, असे बोलले जाते. पण, याला विक्रोळीचा पृथ्वीक प्रताप कांबळे अपवाद ठरला आहे. शितल कुलकर्णी आणि पृथ्वीकच्या जोडीने सोनी मराठी वाहिनीवरच्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या दुसऱ्या पर्वाचे विजेतेपद पटकावले. सर्व स्तरातून त्याच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या पृथ्वीकची कहाणी खडतर आहे. लहानपणीच वडिलांचे डोक्यावरचे छत्र हरवले. मामांनी अशावेळी आधार दिला. आईने मेहनत केली. भावाने आपले स्वप्न बाजूला ठेवून पृथ्वीकच्या करिअरसाठी त्याग केला. पण पृथ्वीकने त्यांची मेहनत वाया जाऊ दिली नाही. आज त्याने एका विनोदी कार्यक्रमात विजतेपद मिळवून बघितलेल्या स्वप्नाचा एक टप्पा पार केला आहे.
पृथ्वीकचे उत्कर्ष बालमंदिर येथे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर विकास माध्यमिक विद्यालय येथे १२ वी पर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर कीर्ती महाविद्यालयात बी.एम.एमचे शिक्षण घेतले. इथेच खरेतर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. इथे त्याला नाटकात काम करण्याची संधी मिळाली. राज्यस्तरीय नाटकातही त्याने भाग घेतला. कामगार कला केंद्रातर्फे राबवल्या जाणाऱ्या नाटकातही त्याने भाग घेतला. सुरुवातीला घरातून विरोध झाला. आपण मध्यमवर्गीय आहोत. आपल्याला हे करिअर परवडणारे नाही. चांगली नोकरी कर, असे सांगण्यात आले. परंतु, त्यांनी त्यांचे न ऐकता नाटक, एकांकिका करणे सुरू ठेवले. नाटकात मिळणारे यश पाहता घरच्यांचाही रोष कमी झाला. नंतर 'मोहन प्यारे' सारखी मालिका मिळाली. नंतर एकामागोमाग संधी मिळत गेल्या. ५सेकंदचा रोल ते चक्क २० मिनिटांचा स्टेज शो असा त्याने प्रवास केला आहे.
लहानपणी वडिलांचे छत्र हरवल्यानंतर जबाबदारी आईवर पडली. कालांतराने कुटुंबाचा गाडा चालवण्याची जबाबदारी मोठा भाऊ प्रतीक कांबळे याच्यावर पडली. प्रतिक ही नाटकात काम करत. परंतु, कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्याला हे क्षेत्र सोडावे लागले. पण त्यांनी पृथ्वीकला नाटकाचा रस्ता दाखवला. 'तू तुझे स्वप्न पूर्ण कर, घर मी सांभाळतो' असे त्यांनी सांगितले. आज सेकंदावर चालणाऱ्या युगात भावाने भावासाठी स्वताचे स्वप्न उशीखाली ठेवल्याची ही घटना आहे. पृथ्वीक मोठा झालो म्हणजेच मी मोठा झालो, असे प्रतीक सांगतो. युट्युबवर बेक बेंचर नावाची त्याची वेबसीरीजही खूप गाजली.
कीर्ती महाविद्यालयात मी नाटकाला सुरुवात केली. पण माझी खरी नाटकात काम करण्याची सुरुवात विकास महाविद्यालयापासूनच झाली.पथनाट्य तिथूनच मी शिकलो. माझ्या या क्षेत्राला कुटुंबाचा सुरुवातीला विरोध होता. नंतर त्यांनी माझे काम पाहून मला पाठिंबा दिला. मला जो एक कानमंत्र मिळाला तो मला खूप कामी आला, अपयश आले तर पचवायचे कसे, हे समजले यामुळे मला खूप फायदा आला. अनेक वाईट घटना घडल्या पण मी डगमगलो नाही.
आईने खूप कष्ट केले. मोठ्या भावाला ही नाटकात रस होता. पण काही कौटुंबीक कारणामुळे त्याला या क्षेत्रात पूर्ण वेळ देता आला नाही. नाहीतर तो आज मोठा कलाकार असता तो माझ्यासाठी रिअल हिरो आहे. मामांनी मला खूप साथ दिली. भविष्यात मला कार्यक्षम होतकरू मुलांसाठी एक नाटकाची धडे देणारी संस्था उघडायची आहे. तसेच मला एक कळले की, अभिनय ही शिकण्याची गरज नसते. आपण लहानपणापासून आपल्या रोजच्या आयुष्यात अभिनय करत असतो. फक्त मार्ग कळायला हवा.
कामगार कल्याण केंद्रासाठीही काही तरी करायचे आहे. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरलो, कारण माझी जोडीदार शीतल कुलकर्णीची साथ होती. तिने आणि मी केलेले सादरीकरण हे लोकांना आवडले, त्यामुळे मी विजेता ठरलो. कलाकार म्हणून सर्व रोल करायचे आहेत. वेबसीरीज करणार आहे. युट्यूबवर नियंत्रण असावे.कलेतून शिव्या दिने हा चुकीचा आहे, असे पृथ्वीकने सांगितले.