मुंबई - मागील दहा महिन्यापासून देश कोरोनाच्या संकटाशी लढत असून हे संकट अजूनही दूर झालेले नाही. अशात आता बर्ड फ्ल्यूचे संकट ओढवले आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि झारखंडमध्ये या फ्ल्यूला सुरुवात झाली आहे. सुदैवाने महाराष्ट्रात अजून तरी याचा शिरकाव झालेला नाही. पण, असे असले तरी बेफिकीर न राहता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनामध्ये आपण मास्क लावणे, हात धुणे आणि इतर प्रकारची काळजी घेत आहोत, तीच काळजी घ्यावी. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरकडे जावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
हेही वाचा - ...तर प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तयार; बाळासाहेब थोरातांचे मोठे वक्तव्य
बर्ड फ्ल्यू म्हणजे काय?
बर्ड फ्ल्यू हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा विषाणू असून या आजाराची सुरुवात 1997 मध्ये हाँगकाँग येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये झाली होती. तेव्हापासून हा आजार जगाची पाठ काही सोडताना दिसत नाही. एव्हीयन इन्फ्ल्युएन्झा व्हायरस (H5N1) या विषाणूमुळे हा आजार पक्षांमध्ये होतो. तर, या आजाराने संक्रमित झालेल्या पक्षांच्या संपर्कात आल्यास मानवाला याचा संसर्ग होतो. याकडे दुर्लक्ष केल्यास, वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यू ओढावू शकतो.
असे होते संक्रमण
पक्षांना, त्यातही कोंबड्यांना नैसर्गिकरित्या या विषाणूचा संसर्ग होतो. या आजारात कोंबडी, पक्षी मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडतात. तर, हा आजार झालेल्या कोंबड्यांच्या-पक्षांच्या संपर्कात आल्यास त्यांच्या मल, अनुनासिक स्त्राव, तोंडातील लाळ आणि डोळ्यातील पाणी याद्वारे मानवाला बर्ड फ्ल्यूचा संसर्ग होतो.
ही आहेत लक्षणे
कोरोना प्रमाणेच बर्ड फ्ल्यू हा ही एक फ्ल्यू आहे. त्यामुळे, कोरोना आणि बर्ड फ्ल्यूची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, दम लागणे अशी साधारण लक्षणे आहेत. तर अतिसार, स्नायू दुखी, घसा खवखवने ही बर्ड फ्ल्यूची लक्षणे आहेत. त्यामुळे, अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे धाव घ्या आणि तपासणी करून घ्या, असे आवाहन डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र, यांनी केले आहे.
अजून तरी महाराष्ट्रात या आजाराचा शिरकाव झालेला नाही. त्यामुळे, ही दिलासादायक बाब आहे. पण काळजी घेण्याची गरज आहे. मास्क, हात धुणे, स्वच्छता पाळणे गरजेचे आहे, असेही भोंडवे यांनी स्पष्ट केले.
मास-अंडी खाल्ल्याने बर्ड फ्ल्यू होतो का?
बर्ड फ्ल्यू शब्द उच्चारल्याबरोबर चिकन आणि अंडी खाल्ल्याने हा आजार होतो, असा एक साधारण समज लोकांमध्ये पसरतो. पण, खरच अंडी-चिकन खाल्ल्याने हा आजार पसरतो का? याबाबत डॉ. भोंडवे यांना विचारले असता त्यांनी अंडी आणि चिकनमधून हा आजार पसरत नसल्याचे सांगितले आहे. मात्र, संक्रमित कोंबड्यांची अंडी कच्ची खाऊ नयेत. तर, त्यांचे मासही उखडून खाऊ नये. त्याचवेळी मास १५० अंश सेल्सिअसवर शिजवून खावे, तर अंडी चांगल्या प्रकारे शिजवून खावीत, असेही डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
विषाणू 10 दिवस जिवंत राहतो
कोंबड्या वा इतर पक्षांना या विषाणूची लागण झाल्यास त्यांच्या शरीरात हा विषाणू दिर्घकाळ राहतो. पक्षांचे मल आणि लाळेत तब्बल 10 दिवस हा विषाणू जिवंत राहतो. तेव्हा अशा कोंबड्यांच्या संपर्कात आल्यास मानवाला या आजाराची लागण होते. त्यातही पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्यांना याचा धोका अधिक आहे. तेव्हा काहीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. कारण लक्षणे आढळल्यापासून 48 तासात उपचार मिळाले नाही तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अजून तरी हा आजार नसला, तरी शेजारच्या राज्यात आजार थैमान घालत असल्याने आपण योग्य ती काळजी घेण्याची, तसेच सरकारने आतापासूनच हा आजार दूरच राहील यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळ्यात आणखी एक शिवसेनेचा नेता? भाजपाची चौकशीची मागणी