मुंबई - 'कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झालेला आहे. त्यामुळे मागील लॉकडाऊनच्या कालावधीत एसटी कामगारांना त्यांचे वेतन मिळण्यास अडचणी आल्या. त्या अडचणी पुन्हा येऊ नयेत, यासाठी शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना पुढील 6 महिन्यापर्यंतचे वेतन नियमित व वेळेत मिळण्यासाठी महामंडळास भरीव आर्थिक मदत करावी', अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केली आहे. याबाबत निवेदनसुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संघटनेकडून देण्यात आले आहे.
२ हजार कोटींची मागणी
'कोरोना महामारीमध्ये काम करीत असताना आतापर्यंत ७ हजार ५०० कर्मचाऱ्यांना कोरोना झाला, 198 कर्मचारी कोरोनाने मृत झाले. एसटी कर्मचारी अक्षरश: जिवावर उदार होऊन आपली सेवा बजावत आहेत. त्यांना त्यांचे वेतन व इतर आर्थिक बाबी वेळेत मिळणे आवश्यक आहे. एसटी महामंडळ प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे महामंडळाने कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्चासाठी शासनाकडे २ हजार कोटींची मागणी केल्याचे समजते आहे. मागील लॉकडाऊनच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आपण पुढाकार घेऊन शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळवून घेतले होते. एवढेच नाही तर मार्च २०२१ पर्यंतच्या वेतनासाठी १ हजार कोटींचे विशेष पॅकेज महामंडळास देऊन कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण दूर केली होती. मागील लॉकडाऊनच्या कालावधीत एसटी कामगारांना त्यांचे वेतन मिळण्यास आलेल्या अडचणी पुन्हा येऊ नयेत यासाठी शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना पुढील 6 महिन्यापर्यंतचे वेतन नियमित व वेळेत मिळण्यासाठी महामंडळास भरीव आर्थिक सहाय्य मिळवून देण्याची मागणी केली आहे', अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली आहे.
...तर कर्मचाऱ्यांचा असंतोष वाढेल
'आताही राज्यात लॉकडाऊनमुळे महामंडळाची वाहतूक फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू आहे. इतर प्रवाशी वाहतूक पूर्णत: बंद आहे. इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन व इतर आर्थिक बाबी वेळीच दिल्या जातात. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचे कामाचे स्वरूप इतरांपेक्षा वेगळे आहे. त्यांना त्या मिळत नाहीत. कोरोनामुळे १९८ कर्मचारी मृत झालेले असले तरी फक्त ८ ते १० कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांचे विमा कवच मिळालेले आहे. तसेच कोरोनाने मृत झालेल्या इतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही व मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीही मिळालेली नाही. तसेच वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्तीही मिळत नाही. अशा अनेक आर्थिक संकटात कर्मचारी सापडलेले आहेत. 'कोरोना योद्धा' म्हणून काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ न देणे, हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढेल', असेही संदीप शिंदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - म्हाडा उभारणार सोमय्या मैदानावर 1200 बेडसचे जम्बो कोविड सेंटर, आठवड्याभरात कामाला सुरुवात
हेही वाचा - 'बेळगाव आणि बंगालच्या निवडणुकीवर बोलण्याची शिवसेनेची औकात नाही'