- मुंबई - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आणि दिल्लीमध्ये वाढणारे रुग्ण बघता मुंबईत २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करणे शक्य नाही, असे मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले आहेत. त्या आता १ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. यासोबतच राज्यातील इतर जिल्ह्यातील शाळा कधी उघडणार याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढवा....
- ठाणे - मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले आहेत. सेामवारपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार होते. मात्र, आता नवीन वर्षातच शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. पालकमंत्र्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, शाळा या 31 डिसेंबरनंतर उघडण्याचा निर्णय घेऊ, अशी माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे. याबाबत पालक व शैक्षणिक संस्थांशी चर्चा केली, पालकांमध्ये व शैक्षणिक संस्थेमध्ये अजूनही भीती आहे. पालक मुलांना शाळेत पाठवण्यासाठी तयार नाहीत व शैक्षणिक संस्था शाळा सुरू करण्यास तयार नसल्याने, पालकमत्र्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.
ठाण्यासोबतच पालघर आणि रायगड जिल्ह्यातही शाळा बंद ठेवण्याची मागणी -
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्याप्रमाणेच ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली आहे. याबाबत बोरनारे यांनी ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील संबंधित प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.
- नवी मुंबई - पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबर, 2020पर्यंत बंद राहणार आहेत. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना सदर निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आयुक्त देशमुख यांनी संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या आटोक्यात असला तरी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या काळात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. यादृष्टीने पुढील 4 ते 6 आठवडे खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तटकरे यांनी आयुक्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे. 23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा आता 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.
- पुणे - राज्यात सोमवार, 23 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र, पुणे शहरात शाळा सुरू केल्या जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. कोरोना बाधितांचा आकडा सध्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पुणे महानगर पालिकेची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केला. राज्य सरकारने 23 नोव्हेंबर पासून 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला होता. त्यानुसार पुणे महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबत 13 डिसेंबरनंतर निर्णय घेतला जाईल, असे महापौरांनी जाहीर केले आहे.
- नागपूर - राज्यातील ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याच अनुषगांने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच जिल्ह्यात तयारी करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातही शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. शिवाय कोरोनामुळे विशेष खबरदारी घेत शाळा सुरू करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे.
- औरंगाबाद - राज्यातील शाळा सोमवारपासून (२३ नोव्हेंबर) सुरू होणार असल्या तरी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावेत, असे निर्देश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. त्यानंतर औरंगाबादमध्ये फक्त ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरांनी काल (२० नोव्हेंबर) बैठक घेत ३ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर औरंगाबाद महानगरपालिका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असताना, कोरोनाचे वाढते संकट पाहता पालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी देखील शहरातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षकांना शाळेत यावे लागणार, अशी माहिती त्यांनी दिली.
- जळगाव - जिल्ह्यात सोमवारपासून म्हणजेच २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडणार आहेत. परंतु, पालकांची संमती असेल त्याच विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारची सक्ती शिक्षण विभागाकडून करण्यात येणार नाही. आगामी काळात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर शाळा बंद ठेवण्यात येतील, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.
- कोल्हापूर - कोरोनामुळे गेली आठ महिने बंद असलेल्या महापालिकेच्या शाळेतील घंटा पुन्हा एकदा वाजणार आहे. येत्या सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 370 शिक्षकांची तपासणी तर जवळपास 65 शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. उर्वरित शिक्षकांची तपासणी व शाळांचे निर्जंतुकीकरण व स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
- गडचिरोली - राज्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यातच 23 नोव्हेंबर म्हणजे सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शाळा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली असून या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांना कोरोना तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार गडचिरोली शिक्षण विभागाने तसे नियोजन केले आहे, जिल्ह्यातील 2 हजार 756 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
- सातारा - पन्नास टक्के उपस्थिती, ५० टक्के ऑनलाइन पद्धतीने या तत्त्वावर सोमवार, 23 नोव्हेंबरपासून इयत्ता 9 वी ते 12वीचे वर्ग आणि इयत्ता 9 वी ते 12चे वसतिगृह आश्रमशाळा विशेषत: आंतररराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू होत आहेत. जिल्ह्यातील शाळांनी कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. तर दिनांक 23 नोव्हेंबरपासून इयत्ता 9 वी व 12वीचे वसतिगृह, आश्रमशाळा विशेषत: आंतररराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना योजाव्यात, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
- गोंदिया - अखेर सोमवारपासून (23 नोव्हेंबर) जिल्ह्यात इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक कुमार मीना यांनी शासन निर्देशाप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील सीमाक्षेत्रामध्ये कंटेनमेंट झोन वगळून जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांतर्गत येत असलेली शाळा/विद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच इयत्ता ९ वी ते १२ वीचे वसतिगृह व आश्रमशाळा विशेषत: आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- नाशिक - जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि शाळेत मुलांना पाठवण्याच्या पालकांच्या संमती पत्रावर नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू कराव्यात की नाही? याबाबतचा निर्णय उद्या (22 नोव्हेंबर) होणाऱ्या प्रशासकीय बैठकीत घेणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.