मुंबई - राज्यात मागील २४ तासात सर्वोच्च १४ हजार ४९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ३२६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील २४ तासात राज्यात १२ हजार २४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.३७ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्याचा मृत्यू दर ३.३२ टक्के एवढा आहे.
राज्यात आज ३२६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४६, ठाणे ८, नवी मुंबई मनपा ३, कल्याण डोंबिवली मनपा २, वसई विरार मनपा ४, रायगड ४, पनवेल २, नाशिक ७, अहमदनगर १७, जळगाव २०, पुणे ५९ पिंपरी चिंचवड मनपा ३६, सोलापूर ३, कोल्हापूर २२, सांगली १५, नागपूर २१ यांचा समावेश आहे.
नोंद झालेल्या एकूण ३२६ मृत्यू पैकी २३१ मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर ६३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. हे ३२ मृत्यू पुणे १४, कोल्हापुर ८, ठाणे ४, औरंगाबाद २, जळगाव २ , नाशिक १ आणि सांगली १ असे आहेत.
आज १२ हजार २४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४ लाख ५९ हजार १२४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.३७ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात ११ लाख ७६ हजार २६१ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ३७ हजार ६३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३४ लाख १४ हजार ८०९ नमुन्यांपैकी ६ लाख ४३ हजार २८९ (१८.८४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, आजपासून मिशन बिगीन अंतर्गत राज्य सरकारने जिल्हा अंतर्गत प्रवास खुले केले आहे. आजपासून बस सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.