मुंबई - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्कीही झाली. याबाबत महाराष्ट्रातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. हाथरस पीडितेच्या कुटुंबियांची विचारपूस करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी जात होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेली धक्काबुक्की अत्यंत निंदनीय आणि लोकशाहीचा गळा घोटणारी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
पीडितेच्या कुटुंबियांना आधार देण्याची गरज आहे. त्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जात होते. मात्र, त्यांना अडवून धक्काबुक्की केली गेली. राष्ट्रीय नेत्यांना धक्काबुक्की करणे हे अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज आणि जंगलराज सुरू आहे. या गुंडाराज सरकारला स्वतः भाजपाचा पूर्ण सपोर्ट आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीवरून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर संतप्त झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचा खुन होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीदेखील ट्विटकरून संताप व्यक्त केला. उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज असल्याचे थोरात म्हणाले. काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादीनेही गांधी भावंडांना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीचा निषेध नोंदवला आहे. कुठल्याही राज्याचे प्रशासन असो, बलात्कारासारखी लाजिरवाणी घटना घडल्यानंतर शासनाने फास्टट्रॅक पद्धतीने कारवाई केली पाहिजे. या मागणीसाठीच राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात होते. पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे.