मुंबई : राज्याच्या विविध भागात होणाऱ्या जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे. वरुणराजाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान आजही काही जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज 4 जिल्ह्यांना रेड, 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या काही दिवस अजून दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर कायम : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याची तीव्रता वाढली आहे. हे क्षेत्र अधिक तीव्र होत असून ते वायव्य दिशेने सरकत आहे. अरबी समुद्रात दक्षिण कोकण ते उत्तर केरळपर्यंतच्या किनारपट्टी भागात ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व- पश्चिम वाऱ्यांचे क्षेत्रही महाराष्ट्राजवळ प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यात मान्सूनचा जोर वाढला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये ठाणे, पालघर या भागात जोरदार पाऊस होत आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान पुढील दोन दिवस मान्सूनचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
येथे होणार पाऊस : आजही राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदूर्ग, कोल्हापूर, ठाणे, पालघर, आणि मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर गडचिरोली, गोंदिया आणि नांदेडसाठी ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी तसेच उत्तर महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. यात पालघर,चंद्रपूर, गडचिरोली,यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.
शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी: रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. याविषयीची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन देण्यात आली आहे. या जिल्ह्यात असलेल्या 6 पैकी 1 नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. 25 जुलैला रात्री 11 वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलंडली आहे. तर सावित्री, अंबा, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या पाच नद्या अजून धोक्याच्या पातळीखाली वाहत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देण्यात आले आहे. आयएमडीने दिलेल्या इशारा लक्षात घेता नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा -