मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान असणारे नेते म्हणजे शरद पवार. मात्र याच शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेकदा यू टर्न घेतला आहे. याचा त्यांना अनेकदा फायदा झाला आहे तर बऱ्याच वेळा नुकसान देखील झाले आहे. नुकताच शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर तो पुन्हा मागे घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. पवारांनी राजकारणात केव्हा केव्हा यू टर्न घेतला आणि त्यामुळे आता समाज माध्यमांवर यू टर्न असणाऱ्या रस्त्यांना 'काका चौक' नाव द्या, असे का म्हटले जाते आहे हे जाणून घेऊया.
शरद पवारांच्या यू टर्नचीच चर्चा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व असले तरी त्यांनी सातत्याने घेतलेल्या यू टर्नवर आता जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी आधी आपण पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असून तो मागे घेणार नसल्याचे म्हटले. मात्र तीन दिवसांच्या नाट्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण पुन्हा एकदा पक्षाध्यक्षपदी विराजमान होत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह : वास्तविक देशाच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी असूनही शरद पवारांना अनेकदा महत्त्वाच्या पदांनी हुलकावणी दिली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शरद पवारांची विश्वासार्हता. पवारांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत वारंवार भूमिका बदलल्याने त्यांना राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये महत्त्व असूनही अपेक्षित यश मिळवता आले नाही, असे जेष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी सांगतात.
देशाच्या राजकारणात गेल्या 50 वर्षांपासून टिकून असूनही शरद पवारांना अनेकदा महत्त्वाच्या पदांनी हुलकावणी दिली आहे. शरद पवारांची विश्वासार्हता हे या मागचे मुख्य कारण आहे. पवारांनी त्यांच्या कारकीर्दीत वारंवार भूमिका बदलल्याने त्यांना राजकारणामध्ये महत्त्व असूनही अपेक्षित यश मिळवता आले नाही - ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी
शरद पवार हे गेल्या 50 पेक्षा अधिक वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत. शरद पवार यांची राष्ट्रीय राजकारणामध्ये निश्चितच चांगली प्रतिमा आहे. शरद पवार यांची राज्यातल्या विविध पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांशी जवळीक आहे. शरद पवारांच्या संपर्काला आणि शब्दाला राजकीय वजन आहे. मात्र या प्रतिमेला आणखीही एक बाजू आहे. ती म्हणजे बेभरवशाची. शरद पवार यांच्या बद्दल राज्यातील आणि राष्ट्रीय राजकारणातही नेहमीच संशय आणि पाहिले जाते शरद पवार हे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतील याची शाश्वता त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात इतकी वर्ष असूनही शरद पवारांना महत्त्वाच्या पदांवर जाता आले नाही. - राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकारण गेल्या काही वर्षांपासून आम्ही जवळून पाहत आहोत. शरद पवार हे अत्यंत चाणाक्ष अभ्यासू आणि प्रचंड जनसंपर्क असलेले नेते आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यांमध्ये पवारांचा जनसंपर्क आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातील प्रश्नांची त्यांना जाणही आहे. शरद पवार हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व आहे असे म्हणता येईल. परंतु असे असले तरी शरद पवार यांचे राजकीय वर्तन म्हणजे कही पे निगाहे कही पे निशाना असेच आहे. या संदर्भात नितीन गडकरी यांनी अतिशय चांगले उदाहरण दिले होते. गडकरी म्हणाले की, एखादी सुंदर महिला जर काळी असेल तर प्रत्येकाला वाटते ती आपल्याकडेच पाहत आहे. शरद पवारांचे तसेच आहे. एकूणच शरद पवार यांच्याबद्दल राजकीय विश्वासार्हता कमी आहे. - ज्येष्ठ राजकीय विश्लेषक चंदन शिरवाले
शरद पवारांचे यू टर्न
- शरद पवार यांनी 1977 मध्ये आणीबाणी नंतर इंदिरा गांधींच्या पक्षाची साथ सोडली. रेड्डी काँग्रेस मध्ये दाखल झालेल्या शरद पवारांनी सत्ता स्थापनेत सहभाग घेतला.
- 1978 मध्ये 38 आमदारांसोबत बंड करून शरद पवारांनी यू टर्न घेत 'पुलोद'चे सरकार स्थापन केले.
- इंदिरा काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या शरद पवार यांनी पुन्हा यू टर्न घेत 1986 मध्ये काँग्रेसमध्ये सामिल झाले.
- 1978 मध्ये वसंतदादांचे सरकार पाडणाऱ्या शरद पवारांना वसंतदादांनीच 1988 मध्ये मुख्यमंत्रीपदी बसवले.
- 1991 मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या पवारांना त्यांच्या विश्वासार्हतेमुळेच पराभव पत्करावा लागला.
- 1996 मध्ये पंतप्रधान पदाने पुन्हा हुलकावणी दिल्यानंतर शरद पवारांनी 1999 मध्ये सोनिया गांधीच्या विदेशी मुळावर टीका करत काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
- मात्र पुन्हा यू टर्न घेत 2004 मध्ये काँग्रेस सोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली.
- काँग्रेससह यूपीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने 2014 मध्ये यू टर्न घेत महाराष्ट्रातील युती सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
- नुकतेच केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसने हिंडेंनबर्गच्या अहवालाचा दाखला देत केंद्र सरकार आणि अदानीच्या विरोधात जेपीसीची मागणी केली. मात्र जेपीसीची आवश्यकता नाही, असा यू टर्न शरद पवार यांनी घेतला.
'शरद पवारांच्या यू-टर्न वरून मीम्स' : एकूणच राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये नेहमीच महत्त्वाचे स्थानी असूनही शरद पवार यांच्याकडे कायमच संशयाच्या नजरेने पाहिलं गेलं आहे. शरद पवार केव्हा कुठला निर्णय घेतील आणि केव्हा कोलांटी उडी मारतील याची कोणालाच खात्री नसते. शरद पवारांच्या या कोलांट्या उड्या आणि यू टर्नची आता समाज माध्यमांवरूनही खिल्ली उडवली जात आहे. याबाबत समाज माध्यमांवर प्रतिक्रिया उमटत असून जिथे जिथे रस्त्यांना यू-टर्न असतील ती त्या त्या रस्त्यांना 'काका चौक' असे नाव द्यावे, असे मीन्स मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत.
हेही वाचा :
- Sharad Pawar Mind Gamer : भाजपाविरोधकांची एकजूट बनवणाऱ्या शरद पवारांच्या मनात आहे तरी काय? अनेकवेळा बदलला डाव
- Raj Thackeray on Karnataka Election : राज ठाकरेंचे कर्नाटकातील मतदारांना आवाहन; म्हणाले....
- Abdul Sattar on Sanjay Raut : 'त्या' महाकुत्र्याला राज्यसभेवर आम्हीच पाठवलं; अब्दुल सत्तारांची जीभ घसरली