मुंबई : 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका जशा जवळ येत चालल्या आहेत, तसं महाराष्ट्रात राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसत आहेत. 9 महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार फोडून देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्ता समीकरणाच्या व्याख्याच बदलल्या गेल्या. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2024 च्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सोबत आम्ही असू की नाही याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही, असं सूचक विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शरद पवार हेच निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीचे वक्तव्य करतात, या मागचं नेमकं कारण काय असू शकतं? याविषयी चर्चांना उधाण आलं आहे.
आघाडीत बिघाडीचे कारण काय? : काही दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात मला एकट्यालाच लढावं लागणार आहे, असं वक्तव्य केले होते. आता शरद पवार यांनी 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल हे आताच सांगू शकत नाही, असे सांगितल्याने महाविकास आघाडीत नक्कीच मोठी फूट पडणार असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचा समावेश असून या तिघांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची जवळीक आहे. शिवसेनेचे संजय राऊत हे शरद पवारांची सातत्याने भेट घेत असतात. काही दिवसांपूर्वी खुद्द उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. अशातच शरद पवार व ठाकरे यांची वाढती जवळीक ही अजित पवारांनाही खटकल्याचे दिसून आलं होतं. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडण्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या व त्यावर अजित पवार यांनीच खुद्द स्पष्टीकरण देऊन या विषयाला जरी पूर्णविराम दिला असला तरीसुद्धा अजित पवारांचा पूर्व इतिहास पाहता व सध्याच्या हालचाली पाहता ते अखेरच्या क्षणी आपली भूमिका बदलूही शकतात, हे सुद्धा तितकच खरं आहे.
भाजपची अदृश्य शक्ती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दिल्लीतील नेतृत्व नाराज असून लवकरच त्यांची हकालपट्टी केली जाणार आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत हे वारंवार भाजपसह शिंदे गटावर हल्ला करत आले आहेत. संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावरही अनेकदा भाष्य केल्याने त्याला शेवटी अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिले. मात्र सध्याच्या घडामोडी पाहता महाविकास आघाडीमध्ये नक्कीच काहीतरी खलबतं सुरू असून यामागे भाजपची अदृश्य शक्ती तर काम करत नाही ना? अशी शंका निर्माण होते.
जेपीसी, स्वातंत्र्यवीर सावरकर वादाचे मुद्दे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या कर्ज बुडीत प्रकरणावरून जेपीसीची मागणी केली आहे. मात्र त्याला शरद पवारांनी विरोध दर्शवला असल्याने काँग्रेस त्यांच्यावर नाराज असल्याची चिन्ह आहेत. शरद पवार यांनी जेपीसी ऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती प्रभावी राहील अशी भूमिका घेतल्याने शरद पवारांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यामध्ये खलबत सुरू झाली असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे व काँग्रेस यांच्यामध्ये सुद्धा अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे.
विरोधी पक्षांनी आत्ताच हार स्वीकारली? : शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते राम कदम यांनी शरद पवारांचे वक्तव्य म्हणजे देशातील विरोधी पक्षाची मोदी विरोधात लढण्याची क्षमता नसल्याचं म्हटलं आहे. राम कदम म्हणतात की, देशातील विरोधी पक्ष आदरणीय मोदीजी व भाजपच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची भाषा करत आहे. मात्र सर्व सुरू असताना दुसरीकडे याच विरोधी पक्षाचे नेते शरद पवार यांनी विपक्ष एकत्र येणार असल्याची हवाच काढून टाकली आहे. तसेच देशाच सोडा परंतु राज्यात सुद्धा 2024 च्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल की नाही? यावर सुद्धा त्यांनी शंका उपस्थित केली आहे. आता देशातील विरोधी पक्ष नेत्यांनी हे पूर्णपणे स्वीकारलं आहे की 2024 च्या निवडणुकीत ते भाजप बरोबर दोन हात करू शकणार नाहीत. शरद पवारांचं हे वक्तव्य हेच सांगत आहे की, विरोधी पक्षाने पूर्णपणे हार स्वीकारली असून भाजपचा विजय त्यांनी आत्ताच सुनिश्चित केला आहे, असेही राम कदम म्हणाले.
राज्यातील राजकारण अस्थिर करण्याचं काम : शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कोणी कोणासोबत जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शरद पवार यांचे ते वैयक्तिक मत आहे. ते फार मोठे नेते आहेत. त्यांनी नेहमी देशहिताचं काम केलं आहे. त्यांच्या मनामध्ये काय आहे, हे मी कसं सांगू शकतो? परंतु भाजप विरोधामध्ये जे जे येतील त्या सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचे काम काँग्रेस करत आहे. यापूर्वी सुद्धा काँग्रेस सत्तेमध्ये असताना काँग्रेस ने कधीही ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर केला नाही. परंतु भाजपकडून या यंत्रणांचा गैरवापर केला जात असून नेत्यांवर दबाव आणण्याचं षडयंत्र सुरू आहे. तर राज्यातील राजकारणाचे वातावरण अस्थिर करण्याचे काम भाजपकडूनच होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अप्पासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे.