मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यातच खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी मोठा दावा केला आहे. आमदार सुनील राऊत यांनी आपल्याला तब्बल शंभर कोटींची ऑफर असल्याचा दावा केला आहे.
आपल्याला देण्यात आली शंभर कोटीची ऑफर : माध्यमांशी बोलताना आमदार सुनील राऊत म्हणाले की, 'या आधी देखील मला शंभर कोटीची ऑफर देण्यात आली होती. आज सुद्धा मला ती ऑफर आहे. पण, मी ती स्वीकारली नाही. मी ऑफर स्वीकारणार नाही. मी एक आमदार आहे. सोबतच माझ्यामागे खासदार संजय राऊत नावाचा ब्रँड आहे. या ब्रँडमुळेच मला शंभर कोटींची ऑफर आहे. मी आणि माझं पूर्ण कुटुंब हे निष्ठावंत शिवसैनिकांचं आहे. त्यामुळे हे पैसे घेऊन आम्ही बदलणार नाही. संजय राऊत चार महिने तुरुंगात होते. त्यावेळी त्यांनी गुडघे टेकले नाहीत. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत. असत्यासमोर झुकणार नाही', असंही सुनील राऊत यावेळी म्हणाले.
संजय राऊत यांनी भाजपसमोर गुडघे टेकले असते तर, त्यांना तुरुंगात जावं लागलं नसतं. ते चार महिने आमच्या कुटुंबानं कसे काढले? आमच्या कुटुंबाला काय त्रास सहन करावा लागला? हे आम्हालाच माहिती आहे. त्या काळात आम्ही सर्व काही सहन केलं. पण, पक्ष सोडला नाही, निष्ठा सोडली नाही. आता सुद्धा सहन करू-आमदार सुनील राऊत
पंधरा कोटी फंड आणि पाच कोटी कॅशची ऑफर : "उपेंद्र सावंत जरी शिंदे गटात गेले असले, तरी त्यांच्यासोबत कोणी गेलेलं नाही. माझ्या मतदारसंघात मंगळवारी बैठक लावली होती. सावंत मला म्हणत होते. पंधरा कोटी फंड आणि पाच कोटी कॅश अशी ऑफर आहे. मात्र, मी जाणार नाही. ते अचानक गेले. मी जर नसतो तर उपेंद्र सावंत हे बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये गेले असते. मी त्यातून त्यांना बाहेर काढलं. त्यामुळे उपेंद्र सावंत यांनी आम्हाला शिकवू नये असंही सुनील राऊत यांनी यावेळी सांगितलं. दिल्लीसमोर आम्ही झुकणारे लोक नाही', असं देखील आमदार सुनील राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :