मुंबई : महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारीसाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विविध विभाग, सेल, आघाड्या, संघटनांचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची गुरुवारी बैठकी पार पडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाच्या राज्यातील लोकसभा, विधानसभेच्या सर्वच जागा निवडून आणण्याचा निर्धार प्रत्येक कार्यकर्त्याने करावे, असे आवाहन केले आहे. ते मुंबईत बोलत होते.
'वंचित'चा प्रस्ताव नाही : महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र, ठाकरे गटासोबत असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत अद्याप समावेश झालेला नाही. तसेच 'वंचित'कडून याबाबत कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. 'वंचित'कडून प्रस्ताव आल्यास याबाबत निर्णय घेतला जाईल, असे देखील पटोले यांनी म्हटले आहे.
भाजपाला सत्तेवरून हटविण्याचा प्रयत्न : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. पक्षांतर्गत बैठकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. लोकसभेच्या ४८ जागांवर, विधानसभेच्या सर्व मतदारसंघात काँग्रेस संघटना, सेल, विभाग, आघाडी संघटनांनी पूर्ण ताकदीने कामाला लागण्याचे आवाहन पटोले यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. सर्व घटक पक्षांना काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी 39 सेलची स्थापना करण्यात आली आहे. पटोले म्हणाले की, केंद्रात तसेच राज्यातील भाजपा सरकारला जनता कंटाळली आहे. भाजपाला सत्तेवरून हटविण्याचा काँग्रेस प्रयत्न करणार आहे.
सरकारच्या विरोधात बोलले तर कारवाई : सरकारच्या विरोधात बोलले तर कारवाईचा बडगा उगारला जातो, असाच प्रकार नागपुरातील वकील सतीश उके यांच्याबाबत घडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात कोणतीही माहिती दिली नसल्याची तक्रार सतीश उके यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, असे पटोले म्हणाले.
भाजपाची संविधान बदलण्याची भाषा : आरएसएस, भाजपा वारंवार संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी एका लेखाद्वारे संविधान बदलण्यावर भाष्य केले. तसेच खासदार रंजन गोगोई यांनीही राज्यघटनेची मूळ रचना बदलण्याची भाषा केली आहे. त्यामुळे भाजपा या प्रकारच्या विधानाशी सहमत आहे का? याचे उत्तर पंतप्रधान मोदींनी दिले पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा -