मुंबई - अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे आज स्पष्ट केले आहेत. ३० तारखेपासून पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडे अर्ज केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांची उपस्थिती होती.
निवडणूक आयोगाकडे चिन्ह आणि नावाची मागणी - यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. पक्ष म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे चिन्ह आणि नावाची मागणी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संख्याबळानुसार पक्ष अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचा दावा पटेल यांनी केला आहे. अजित दादांची सर्वानुमते निवड केली होती, असेही पटेल यांनी सांगितले. ३० जूनला पक्षाची महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती पटेल यांनी दिली.
पक्ष प्रतोदाची निवड ३० तारखेलाच - नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे अर्ज त्याचवेळी करण्यात आला होत. कार्यकारी अध्यक्ष तसेच पक्ष प्रतोदाची निवड ३० तारखेलाच करण्यात आली होती अशी माहितीही प्रफुल्ल पटेल यांनी दिली. नवीन नियुक्त्याबाबतही निवडणूक आयोगाकडे अर्ज केल्याचे पटेल यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार सर्वकाही सुरु असल्याचा दावाही पटेल यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला.
शरद पवारांची दिल्लीतील बैठक अनधिकृत - शरद पवार यांनी काल दिल्लीमध्यै बैठक घेतली होती. ही बैठक अधिकृतच नसल्याचा दावा यावेळी पटेल यांनी केला. दिल्लीत झालेली बैठक ही पक्षाची अधिकृत बैठक मानता येणार नाही असेही पटेल म्हणाले. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत प्रतोद म्हणून नियुक्ती केल्याची माहितीही पटेल यांनी दिली. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून अजित पवार यांनी आपली निवड केल्याची माहितीही प्रफुल्ल पटेल यानी यावेळी दिली. विधानसभा अध्यक्षांनाही नवीन नियुक्त्यांच्या संदर्भात पत्र दिल्याची माहिती पटेल यानी पत्रकार परिषदेत दिली.
कुणाचा पक्ष खरा - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या नेमका पक्ष कुणाचा यावरुन चांगलाच संघर्ष काका पुतण्यामध्ये सुरू असल्याचे दिसत आहे. यामध्ये आता हा लढा निवडणूक आयोग आणि कोर्टात जाण्याची शक्यताही आहे. त्यातच पुढील आठवड्यात पावसाळी अधिवेश सुरू होत आहे. त्यामुळे या अधिवेशनात कोण व्हिप काढणार. कुणाचा पक्ष खरा कोण कुठे बसणार यावरुनही वेगवेगळ्या अटकळी वर्तवल्या जात आहेत.
हेही वाचा...