मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना भरघोस निधीची तरतूद केली आहे. दुसरीकडे विरोधकांकडून निधी वाटप करण्यात आले नसल्याचा आरोप होत आहे. विधिमंडळात आज आमदारांना करण्यात येणाऱ्या निधीवाटपावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Live Updates:
- अनेक आमदार सभागृहात मोबाईल फोनवर बोलत असतात. असे यापुढे आढळल्यास मोबाईल जप्त केले जातील, अशी ताकीद विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात दिली आहे.
- ऑनलाईन जुगार संदर्भात जाहिराती करायच्या की नाही, हे त्यांनी ठरवावे. याबाबत भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा अभिमान वाटतो. त्यांनी जुगाराची अ एकही जाहिरात केली नाही.
- एक बजेट झाल्यानंतर लगेच दुसरा निधी बजेट ही नवी परंपरा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस आम्हाला आमच्याकडून फार अपेक्षा आहेत. अमोल मिटकरी, मनीषा कायंदे यांना निधी भेटायला हवाच, असा टोला ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी लगावला आहे.
- निधी वाटपात संदर्भात साधारणपणे आपल्याकडे प्रस्ताव आल्यावर विभाग ईपीसी तयार करते. याच्या आधारावर मान्यता असते. या सर्वात सर्वच मागण्या मंजूर होतात असे नाही. विरोधी पक्षांनी जो विषय मांडला आहे. त्यात मला इतिहासात जावे लागेल. मी ५ वर्ष मुख्यमंत्री असताना अशी कुठलीच चर्चा झाली नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षात एक फुटकी कवडी भेटली नाही. कोविड हे फक्त विरोधी पक्षासाठी होते. तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारणार नाही. विरोधी पक्षनेते आज आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. ते तेव्हा शिकवायला पाहिजे होते. मेरिट आधारावर कामांवर आणलेली स्थगिती उठवली गेली आहे. आमच्याबरोबर राष्ट्रवादीचे जे आमदार आले नाही त्यांनाही निधी दिला गेला आहे. हा निधी कमी जास्त असू शकतो. विधान परिषदेच्या आमदार निधीबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिल्यानंतर अखेर रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेतले आहे.
- गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांची भेट घेत चर्चा केली आहे. एमआयडीसी संदर्भात आश्वासन देऊनही अंमलबजावणी झाली नसल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
- शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत सरकारची मानसिकता दिसत नाही, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नसून अजून अवकाळी पावसाची मदत करण्यात आली नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यावर गिरीश महाजन यांनी मदत वाटपाबाबत राज्य सरकार गंभीर असल्याचे सांगितले.
- एमआयडीसी अधिसूचना जारी करेपर्यंत माघार घेणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. दुसरीकडे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी सुरू आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी टाळ वाजवून आंदोलन केले.
- कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी आंदोलन केले आहे. कर्जत जामखेड एमआयडीसीची प्रश्न सोडवावा, अशी त्यांनी मागणी केली आहे. आमदार पवार यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले आहे.
आमदार रोहित पवार यांनी आपले उपोषण मागे घ्यावे. शिवरायांच्या पुतळ्यासमोर आंदोलन न करता सभागृहात बोलावे. सभागृहाच्या पायऱ्यांवर उपोषण करणे योग्य नाही-राहुल नार्वेकर
अर्थमंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना भरघोस निधी-अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून जबाबदारी आल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना भरघोस निधी देऊन खूष केला आहे. शरद पवार गटातील आमदार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याही मतदारसंघात चांगला निधी दिला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात निधी देण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास कामासाठी २५ ते ५० कोटी पर्यंत निधी मंजूर झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. एकीकडे सत्ताधीर आमदारांना निधीचे भरघोस वाटप होताना विरोधकांच्या मतदारसंघात निधी मिळत नाही, असा विरोधी पक्षात्या नेत्यांचा आरोप आहे. शिंदे गटाकडून अजित पवार यांच्या अर्थमंत्री पदाबाबत आक्षेप घेण्यात आला होता. त्यांची नाराजी दूर करण्यासाठीही अजित पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघासाठी देखील भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेत्याची निवड रखडली- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर विविध मुद्द्यांवरून हल्लाबोल केला. मात्र, विरोधी पक्षनेते पदाची सर्वाधिक उणीव दिसून आली. राज्यात संख्याबळ जास्त असलेल्या काँग्रेसने अजूनही विरोधी पक्षनेत्याची निवड केली नाही. दुसरीकडे राज्यातील काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते पदासाठी हायकंमाडच्या निर्णयाची प्रतिक्षा करत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असल्याने सभागृहात मंत्र्यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचा परिणाम कामकाजावर होत आहे.
राष्ट्रवादीत संभ्रमावस्था- राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट झाल्यानंतर अजित पवार समर्थकांचा गट सत्तेत सहभागी झाला आहे. तर शरद पवार यांच्या समर्थकांचा गट विरोधात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत संभ्रमावस्था दिसून येत आहे. दोन्ही गटांनी आपले नवीन प्रतोद जाहीर केले. त्यानंतर आपलाच व्हीप लागू होईल, असे जाहीर केले. मात्र, सभागृहात कोणाचा व्हीप चालणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा-