मुंबई : विरोधकांनी निधी वाटपावरून लावलेल्या आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निधी वाटपासंदर्भात साधारणपणे आपल्याकडे प्रस्ताव आल्यावर विभाग ईपीसी तयार करते. याच्या आधारावर मान्यता दिली जाते. यातील सर्वच मागण्या मंजूर होतात असे नाही. विरोधी पक्षांनी जो विषय मांडला आहे, त्यात मला इतिहासात जावे लागेल. मी ५ वर्ष मुख्यमंत्री असताना निधी वाटपाच्या विषयावर अशी कुठलीच चर्चा झाली नाही. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षात एक फुटकी कवडी विरोधी आमदारांना भेटली नाही, असे म्हणत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच कोविड हा फक्त विरोधी पक्षासाठी होता का? असा प्रश्न विचारत तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारणार नाही, असे म्हटले आहे.
आमदार निधीबाबत योग्य निर्णय : विरोधी पक्षनेते आज आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. ते तेव्हा शिकवायला पाहिजे होते. मेरिट आधारावर कामांवर आणलेली स्थगिती उठवली गेली आहे. आमच्या बरोबर राष्ट्रवादीचे जे आमदार आले नाही, त्यांनाही निधी दिला गेला आहे. हा निधी कमी जास्त असू शकतो असे सांगत, विधान परिषदेच्या आमदार निधीबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
निधी कशासाठी देण्यात आला : आमदारांना निधी वाटप करताना वित्त मंत्री अजित पवार यांनी असमान निधी वाटप केला असून याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, कुणाला किती निधी दिला हे सांगायला मला सभागृहात भाग पाडू नका. काही आमदारांना ४६ कोटी निधी एका मतदारसंघात दिला आहे. तर काही आमदारांना एक रुपयाही भेटला नाही आहे. ज्या मतदार संघात निधी दिला गेला नाही, ते आमदार कर भरत नाहीत का? राष्ट्रवादीच्या काही आमदारांना २५ नाही तर ५० कोटींचा निधी दिल्याची माहिती आहे. मागच्या सरकारने विकासकामांना स्थगिती दिली होती. मग निधी कशासाठी देण्यात आला आहे? असा प्रश्न विचारत कुणाला किती निधी दिला, हे सांगायला मला सभागृहात भाग पाडू नका, असे दानवे म्हणाले आहेत.
निधी वाटपात भेदभाव : या मुद्यावर बोलताना काँग्रेसचे आमदार भाई जगताप म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फायनान्स चांगला पाठ आहे. त्यात त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. परंतु निधी वाटपात भेदभाव बघायला भेटतो, हे चांगले नाही. सर्वांना समान निधी वाटप झाला आहे, असे मला समजले. पण आमच्या लोकांना याविषयी काहीच माहीत नाही. कुणाला किती भेटला हे माहीत नाही. काही आमदारांना काहीच भेटले नाही. शेवटी आमदारांच्या क्षेत्रातील विकासासाठी निधी असतो, म्हणून त्यात भेदभाव करू नये असे भाई जगताप म्हणाले. तर उबाठा गटाचे नेते, आमदार सचिन अहिर म्हणाले की, एक बजेट झाल्यानंतर लगेच दुसरे निधी बजेट ही नवी परंपरा सुरू झाली आहे का? देवेंद्र फडणवीस आम्हाला आपल्याकडून फार अपेक्षा आहेत. पण आता सुपर पावर असल्या कारणाने काहीही होऊ शकते, असा चिमटा काढत अमोल मिटकरी, मनीषा कायंदे यांना तरी निधी भेटायला हवाच असा टोलाही सचिन अहिर यांनी लगावला आहे.
हेही वाचा :
- Maharashtra Monsoon session 2023 Updates: जुगारासंदर्भात सचिन तेंडुलकर यांनी एकही जाहिरात केली नाही, याचा अभिमान-देवेंद्र फडणवीस
- Rohit Pawar News : उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रोहित पवार यांनी विधानभवनातील आंदोलन घेतले मागे, सरकारला दिला 'हा' इशारा
- Monsoon Session 2023 : पालघर साधू हत्याकांडावर उद्धव ठाकरे उत्तर देऊ शकले नाही, अनुराग ठाकूर यांचा विरोधकांवर हल्लाबोल