मुंबई - जळगावमध्ये बर्ड फ्लूचा धोका कायम आहे. बुधवारी जळगाव आणि नंदूरबारमध्ये दिवसभरात ६९ कोंबड्यांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्यात ८४ कोंबड्या दगावल्या. मात्र, राज्यात बर्ड फ्लू पूर्ण नियंत्रणात आल्याचा दावा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व विकास मंत्री सुनील केदार यांनी केला आहे.
राज्यात बुधवारी जळगाव जिल्ह्यात ३८ आणि नंदुरबार जिल्ह्यात ३१, अशा एकूण ६९ कोंबड्यांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण ७० पक्षी मृत झाले असून यात एका कावळ्याचाही समावेश आहे. मृत पक्षांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्याची माहिती, मंत्री केदार यांनी दिली.
पोल्ट्री मालकांना ३३८ कोटी रुपयांचे अनुदान -
आतापर्यंत बर्ड फ्लू बाधित क्षेत्रांमधून ७लाख १२ हजार १७२ मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावली. तर, २६ लाख ३ हजार ७२८ अंडी, ७२ लाख ९७४ किलो खाद्य नष्ट केल्याची केल्याची माहिती महाराष्ट्र शासनाने दिली आहे. नुकसान झालेल्या पोल्ट्री फार्मच्या मालकांना ३३८.१३ कोटी रुपयांचे अनुदानाचे दिल्याचे शासनाने म्हटले आहे.
नियमांचे काटेकोर पालन करावे -
सर्व कुक्कुट पक्षीपालकांनी जैव सुरक्षा उपाययोजनांचे तंतोतंत पालन करावे. कोंबड्या विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज्, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता, सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केदार यांनी केले आहे.
अफवा व गैरसमजुती टाळा -
अफवा व गैरसमजुतीमुळे कोंबड्यांचे मांस आणि अंडी खाणे नागरिकांनी बंद किंवा कमी करू नये, असे आवाहन सुनील केदार यांनी केले. पूर्णपणे शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.