मुंबई : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वाद पेटला असताना, महाराष्ट्र सरकार पंतप्रधानांकडे तक्रार करणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) सडकून टीका केली. तक्रार काय करता? त्यांच्या अरे ला कारे ने उत्तर द्या ना. महाराष्ट्राची ताठर भूमिका दिसली पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत. त्या वक्तव्यांना जशास तसे उत्तर देण्याचे काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केले पाहिजे, असे पवार म्हणाले. आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार काहीही कारणे देत असल्याची टीका पवार यांनी केली. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
सरकार डरपोक : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सातत्याने महाराष्ट्र सरकारला आव्हान देत आहेत. सरकारकडून यावर प्रतिक्रिया दिली जात नसल्याने महाराष्ट्र्रातील विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वादाचा (maharashtra karnataka border dispute) प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावचा दौरा करणार होते. कर्नाटक सरकारने येऊ नये, अशी उघडपणे धमकी दिली. तसेच सीमेवर पोलीस बंदोबस्त वाढवला. यामुळे मंत्र्यांनी दौरा लांबणीवर टाकला. महाराष्ट्र सरकार डरपोक असल्याची खरमरीत टीका, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
अरे ला कारे करा : पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर रोजी झालेले आहे. हे अख्ख्या भारताला वर्षानुवर्षे माहिती आहे. त्यामुळे बेळगावच्या दौऱ्याची तारीख निवडताना ६ डिसेंबर रोजी काय आहे. याबाबत कल्पना नव्हती का? त्यांनी बेळगाव दौऱ्याची पुढची तारीख सांगा. कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगत आहेत की, आम्ही महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावमध्ये येऊ देणार नाही. आता ज्या राज्यांत हे दोघे निघालेले आहेत, त्या राज्याचे मुख्यमंत्रीच त्यांना येऊ देत नाहीत. महाराष्ट्राच्या सरकारचे हे अपयश आहे. आपले अपयश झाकण्यासाठी हे थातूरमातूर कारणे देत आहेत, असा टोला पवार यांनी लगावला. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ‘अरे ला कारे’ ने उत्तर द्यावे. केंद्र सरकारकडे तक्रार करून काहीही होणार नाही. आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार काहीही कारणे देत असल्याचे पवार म्हणाले. महाराष्ट्राची ताठर भूमिका यावेळी दाखवून द्यायला हवी, असा सल्ला दिला.