मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असताना कोरोनावरची लसनिर्मिती करण्यासाठी हाफकिन इन्स्टिट्यूट या शासकीय संस्थेला लस निर्मिती करण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या सहभागातून यासाठी निधी उभारला जाणार होता. कोरोनाची लस निर्मिती करण्यासाठी 154 कोटी रुपयांचा प्लांट उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने दिले 196 कोटी : कोरोनाची लस निर्मिती करण्यासाठी बायोफार्मा कॉर्पोरेशन म्हणजेच हाफकिन महामंडळाला परवानगी देण्यात आली होती. भारत बायोटेकच्या सहकार्याने हापकिन लस निर्मिती करणार होते. दीडशे कोटी लस हाफकीनमध्ये तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यादृष्टीने हाफकिनला केंद्राकडून 60 टक्के आणि राज्याकडून 40 टक्के निधी उपलब्ध करून देण्यात येणार होता, यापैकी राज्य शासनाने आपला निधी म्हणून (196)कोटी रुपये हाफकिनला उपलब्ध करून दिले होते. या निधीच्या माध्यमातून कोरोनासाठी लस निर्मिती हाफकीन करणार होते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून याबाबत पुढील कुठलीही कारवाई झाली नाही. हापकिनकडून लस निर्मिती करण्यात आली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारकडून हा किल्ला वेळेवर निधी उपलब्ध झाला नाही.
आता हाफकिनकडून कोरोनाची लस निर्मिती नाही : या संदर्भात राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की हाफकीनला लस निर्मिती करण्याविषयी सांगितले होते. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी झाल्याने नवीन लसूण निर्मिती करण्याची गरज भासत नाही. तसेच, आपल्याकडे अजूनही मोठ्या प्रमाणात लशीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नव्याने लस निर्मिती करण्यात काही अर्थ नाही, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे यापुढे हाफकीनमार्फत कोरोनाची लस निर्मिती करण्यात येणार नाही. तशा सूचना आम्ही हाफकिन इन्स्टिट्यूटला दिल्या आहेत अशी माहिती राठोड यांनी दिली आहे. त्यामुळे दोन वर्ष लसनिर्मिती करता न आलेल्या हाफकिनला आता हा प्रकल्प अर्धवटच सोडावा लागणार आहे.
नव्या रोगांवर लस निर्मिती करावी : कोरोनाच्या लस निर्मितीसाठी राज्य सरकारने दिलेला निधी सरकार परत घेणार नाही, उलट या निधीमधून हाफकीन इन्स्टिट्यूटने आता अन्य रोगांवरील प्रभावी लस संशोधन आणि निर्मिती करावी अशा सूचना आम्ही देणार आहोत अशी माहितीही राठोड यांनी दिली आहे. मात्र, नेमक्या कोणत्या रोगांवर लस निर्मिती केली जाणार आहे आणि ती कधीपर्यंत उपलब्ध होईल याबाबत आत्ताच सांगू शकणार नाही असेही राठोड यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : Scan Boarding Pass : मुंबई विमानतळावर तिकीट बोर्डिंग पास स्कॅन होणार, प्रवाशांचा वेळ वाचणार