मुंबई - गेल्या रविवारी नवी मुंबई येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील उष्णतेची लाट कमी होईपर्यंत दुपार ते सायंकाळी 5 या वेळेत मैदानी कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 13 मृत्यू : यावर्षी हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. मोकळ्या मैदानात झालेल्या या कार्यक्रमासाठी त्यांचे लाखो अनुयायी उपस्थित होते. त्या दिवशी या भागात कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील हजेरी लावली होती.
विरोधकांची सरकारवर टीका : या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या आयोजनावरून विरोधकांनी राज्य सरकारला फटकारले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंबद्दल एकनाथ शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 'ही घटना मानवनिर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकार पूर्णपणे जबाबदार आहे,' असे ट्विट पवार यांनी केले. 'मृतांच्या कुटुंबीयांना अधिक भरपाई द्या', अशी मागणी त्यांनी केली आहे.
'प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये' : वातावरण तापलेले असताना दुपारी हा कार्यक्रम का आयोजित करण्यात आला, या विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना राज्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही वेळ धर्माधिकारी यांनीच सुचविल्याचे सोमवारी सांगितले. 'आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आम्हाला वेळ दिला होता आणि त्यानुसार कार्यक्रमाचे नियोजन केले होते. 'प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये,' असे ते म्हणाले. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी राज्य सरकारवर खरपूस टीका केली आहे. 'कार्यक्रमाचे नियोजन नीट झाले नव्हते. या घटनेची चौकशी कोण करणार?', असा प्रश्न उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.