मुंबई : छत्रपती संभाजीनगर, नागपूरच्या वज्रमूठ सभेनंतर मुंबईतील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात विराट सभा होणार आहे. शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने सभा यशस्वी करण्यासाठी जोर लावला आहे. लाखोंचा जनसमुदाय जमा होईल, असा आघाडीच्या नेत्यांना विश्वास आहे. आदित्य ठाकरे या सभेची विशेष मेहनत घेत आहेत. सध्या खुर्च्या लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सभेच्या तयारीचा कॉंग्रेस नेते भाई जगताप, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आढावा घेत आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरपेक्षा मुंबईतील सभा मोठी करण्याचा आघाडीचा निर्धार आहे. दरम्यान, वाहतूक कोंडीचे नियोजन, शिवसैनिकांना कोणताही अडथळा येणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येत आहे.
दोन वक्त्यांची भाषणे : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत प्रत्येक पक्षाकडून दोन नेत्यांची भाषणे करण्याचा निर्णय झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सर्व सभांचे मुख्य मार्गदर्शन असणार आहेत. संभाजीनगर आणि नागपूरची सभा गाजवल्यानंतर ठाकरेंची बालेकिल्ल्यात तोफ धडाडणार आहे. शिवाय, कॉंग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष भाई जगताप किंवा नसीम खान तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांच्याकडे भाषणाची जबाबदारी असेल, असे समजते. महाविकास आघाडीचे प्रणेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील सभेला संबोधित करावे, असा ठराव देखील मांडण्यात आला आहे. सभेच्या ऐनवेळी यावर निर्णय होण्याची देखील शक्यता असल्याचे बोलले जाते.
विरोधकांची बोलती बंद होईल : मुंबईत शिवसेनेची ताकद काय, हे वेगळे सांगायची गरज नाही. आता तर महाविकास आघाडीची सभा होणार आहे. सभेच्या गर्दीने विरोधकांची बोलती बंद होईल, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. तसेच, मुंबईच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्यांकरिता पार्किंग पासून आरोग्य यंत्रणा, शौचालय, पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.