मुंबई - राज्यात मागील तीन दिवसांपासून सर्वदूर मुसळधार पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे, तर काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 59 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. तरी अद्याप या भागात बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत पूरग्रस्त भागातून सुमारे 90 हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. तर या दरम्यान 75 जनावरांचाही मृत्यू झाला आहे.
सर्व तुकड्यांचे युद्ध पातळीवर काम सुरू -
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाड, पोलादपूर, चिपळूण, रत्नागिरीसह सातारा, कोल्हापूर आणि सांगलीतील विविध भागात तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाला असून येथील जनजीवन हे विस्कळीत झाले आहे. राज्यात विविध भागात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग दिलेल्या सूचनेनुसार आपत्तीग्रस्त जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (NDRF) आणि राज्य आपत्ती व्यवस्थान दल (SDRF) हे युद्ध पातळीवर काम करत आहे.
राज्यात 25 तुकड्यांमार्फत बचाव कार्य -
राज्यात एकुण 25 टीम काम करत आहेत. एनडीआरएफच्या 8 अतिरिक्त तुकड्या भूवनेश्वर येथून बोलवण्यात आल्या आहेत. यापैकी पालघर 1, ठाणे 2, रायगड 1, रत्नागिरी 6, सिंधुदुर्ग 2, सांगली 2, सातारा 3, कोल्हापूर 4, तर मुंबई 2, तर पुण्यात 2 एसडीआरएफ'च्या तुकड्या बचाव कार्य करीत आहेत.
राज्यात पुरामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू, बेपत्ता आणि जखमी नागरिकांची संख्या -
जिल्हा | मृत्यूची संख्या, कंसामध्ये जनावरांच्या मृत्यूची संख्या | जखमी | बेपत्ता |
रायगड | 47 (33) | 28 | 53 |
रत्नागिरी | 11 | ||
कोल्हापूर | 5 (3) | ||
सातारा | 6 (25) | 4 | |
सांगली | (8) | ||
सिंधुदुर्ग | 2 | 3 | |
मुंबई | 4 | 7 | |
पुणे | 1 (6) | ||
ठाणे | 2 | ||
एकुण | 76 (75) | 38 | 59 |
आतापर्यंत पुरामुळे प्रभावित झालेल्या 89 हजार 333 लोकांचे स्थलांतर -
जिल्हा | स्थलांतरीत नागरिक |
रत्नागिरी | 1200 |
सातारा | 734 |
ठाणे | 2681 |
कोल्हापूर | 40882 |
सांगली | 42573 |
पुणे | 263 |
रायगड | 1000 |
एकुण | 89333 |