मुंबई - भारतीय जनता पक्ष हा सोशल मीडियाच्या माध्यमातून विखारी प्रचार करत असून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. परंतु भाजपाच्या या विखारी प्रचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काँग्रेसचा सोशल मीडिया सेलही सक्रीय झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून महाराष्ट्रातील काँग्रेसचे दोन लाख गांधीदूत भाजपाच्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देतील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
काँग्रेसच्या सोशल मीडिया मोहिमेचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, सोशल मीडिया विभागाचे राष्ट्रीय समन्वयक गौरव पंधी आदी उपस्थित होते.
काँग्रेस देणार चोख प्रत्युत्तर-
तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून भाजपा आज समाजात खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करत आहे. परंतु त्यांना आता काँग्रेसकडूनही चोख प्रत्युत्तर मिळेल. भाजपाकडून केला जात असलेला अपप्रचार काँग्रेस सकारात्मकतेने खोडून काढेल व सत्य माहिती जनेतसमोर आणेल. भाजपाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने अपप्रचार केला जातो. पण आता याच माध्यमातून भाजपाला काँग्रेसकडून उत्तर मिळेल, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.
या मोहिमेत तरुणांनी सहभागी व्हावे-
देशात आज १६ ते ३५ वयोगटातील तरुणवर्गाची लोकसंख्या ६२ टक्के आहे. सोशल मीडियाचे महत्व ओळखून देश वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, शेतकरी वाचवण्यासाठी या मोहिमेत तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्याचे आले आहे.